कोल्हापूर : प्रतिनिधी
इस्टेट एजंटांवर जीवेघणा हल्ला करून मध्यवर्ती ताराराणी चौक परिसरातून 17 लाखांची रोकड लूटणार्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषणने छडा लावला. म्होरक्या व टिपस्टर जितेंद्र ऊर्फ पिंटू किसनसिंग रजपूत (वय 33, रा. गणेश कॉलनी, उचगाव, ता. करवीर) याच्यासह चौघांना सोमवारी बेड्या ठोकण्यात आल्या. टोळीकडून 8 लाख 49 हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. पसार हल्लेखोराच्या शोधासाठी विशेष पथके रवाना झाली आहेत.
रजपूतसह चंद्रकांत ऊर्फ बबन पुंडलिक सावरे (33, म्हसोबा मंदिराशेजारी, शिंगणापूर), वैभव ऊर्फ भाई बाबासाहेब कांबळे (23, आंबेडकरनगर, पाडळी), योगेश ऊर्फ गोपी राजेश गागडे (22, रा. गणेशनगर, शिंगणापूर) अशी लुटारूंची नावे आहेत. आणखी एकाचे नाव निष्पन्न झाले आहे. त्याच्या शोधासाठी बेळगाव, निपाणीसह सांगली, मिरजेकडे पथके
रवाना झाली आहेत, असे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले. तीन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते व टीमने ही कामगिरी बजावली आहे, असे ते म्हणाले.
टोळीचा म्होरक्या पिंटू रजपूत रूईकर कॉलनी येथील जमिनीच्या खरेदीदार आशा जाधव यांच्याकडे घरगडी म्हणून कामाला आहे. जमीन खरेदी-विक्री व्यवहाराची त्याला माहिती होती. व्यवहारातील उलाढालीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मित्रांना त्याने टिप देऊन लूटमारीचा स्वत: कट रचल्याचे निष्पन्न झाले आहे, असेही पोलिस अधीक्षकांनी सांगितले.
तिखटपूड डोळ्यावर भिरकावून, कोयत्याने वार करून दोघा वृद्ध इस्टेट एजंटांकडील 17 लाखांची रोकड लूटल्याची थरारक घटना शुक्रवारी (दि. 2) येथील ताराराणी चौक परिसरात राजेश मोटर्सजवळील बसथांब्यावर घडली होती. हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात चारुदत्त कोगे गंभीर जखमी झाले होते. तर त्यांचे सहकारी दिनकर जाधव यांच्या डोळ्यात तिखटपूड टाकली होती.
शहरात मध्यवर्ती चौकात, भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे शहरासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. लूटमारीच्या सतत घडणार्या घटनांपाठोपाठ आणखी एका मोठ्या घटनेची त्यात भर पडल्याने वरिष्ठ पोलिस अधिकार्यांची तारांबळ उडाली होती. पोलिस अधीक्षक मोहिते, पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी पोलिसांची आठ पथके नियुक्त केली होती. सीसीटीव्ही फुटेजद्वारे उपलब्ध छायाचित्रांच्या आधारे हल्लेखोरांचा कोल्हापूर, सांगलीसह बेळगाव जिल्ह्यात शोध सुरू होता. रविवारी मध्यरात्री ‘एलसीबी’ पथकाने ठिकठिकाणी छापे टाकून हल्लेखोरांना जेरबंद केले.
घरगड्याने एजंटांना बोलावून घेतले!
उद्यमनगर येथील सूर्यकांत नलावडे यांच्या प्लॉटचा श्रीमती जाधव यांनी दहा दिवसांपूर्वी व्यवहार केला होता. बहुतांशी रक्कम एजंटांमार्फत देण्यात आली होती. उर्वरित 20 लाख रुपये शुक्रवारी देण्याचे ठरले होते. ही सर्व माहिती संशयित रजपूतला होती. जाधव यांच्या सूचनेनुसार त्याने कोगे, जाधव यांच्याशी संपर्क साधून संबंधित रक्कम घेण्यासाठी दुपारी दोन वाजता एजंटांना बंगल्यावर येण्याचा निरोप दिला. त्यानुसार एजंट बंगल्यावर आले. श्रीमती जाधव यांनी संबंधित रक्कम घरगड्यामार्फत एजंटांकडे दिली.
‘टिपस्टर’ने साथीदारांसह केला पाठलाग
मोठी रक्कम घेण्यास एजंट बंगल्यावर येणार आहेत, अशी रजपूतने मित्रांना टिप दिली. त्यानंतर हल्लेखोर कॉलनीतील बंगल्यासमोरील बोळात थांबले. एजंट 20 लाखांच्या रकमेसह बाहेर पडल्यानंतर स्वत: रजपूत, चंद्रकांत सावरे, वैभव कांबळे, गागडे यांनी मोटारसायकलवरून एजंटांचा पाठलाग सुरू केला.
वाहनांच्या वर्दळीमुळे कोपर्यावरील बेत फसला!
महाडिक कॉलनीच्या कोपर्यावर एजंटांवर हल्ला करून तेथेच लूटण्याचा बेत होता. मात्र, वाहनांच्या वर्दळीमुळे हा बेत फसला. त्यानंतर संशयितांनी पाठलाग करीत राजेश मोटर्सजवळील बसथांब्यावर त्यांना गाठले. कोगे, जाधव यांच्यावर तिखटपूड भिरकावून, कोयत्याने हल्ला करून त्यांच्याकडील 17 लाखांची रोकड लूटली, असेही चौकशीत निष्पन्न झाले आहे, असे मोहिते यांनी सांगितले.
मध्यरात्री तीन ठिकाणी छापे
रविवारी मध्यरात्री दिनकर मोहिते, संजय मोरे, संजीव मोरे, राजेंद्र सानप, युवराज आठरे, श्रीकांत मोहिते, विजय कारंडे, उत्तम सडोलीकर, सुनील इंगवले, शिवाजी खोराटे, यशवंत उपराटे, रमेश डोईफोडे, किरण गावडे, संतोष पाटील, सुजय दावणे, असिफ करयगार, सुरेश चव्हाण, प्रकाश संकपाळ आदींनी सापळा रचून शिंगणापूर, उचगाव, पाडळी येथे छापा टाकून चौघांच्या मुसक्या आवळल्या. अंगझडतीत गुन्ह्यातील 8 लाख 49 हजारांची रोकड सापडली.
टोळीतील साथीदाराचा शोध
टोळीतील आणखी एका फरारी साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे. गुन्ह्यातील मोठी रक्कम त्याच्या ताब्यात आहे. संशयिताच्या शोधासाठी विशेष पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत, असेही सांगण्यात आले.