Sat, Jun 06, 2020 10:01होमपेज › Kolhapur › हाणामारी : सहा.फौजदारासह ३० जणांवर गुन्हे

हाणामारी : सहा.फौजदारासह ३० जणांवर गुन्हे

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 08 2018 1:19AMकोल्हापूर : प्रतिनिधी

दाभोळकर कॉर्नर येथील पादचारी उड्डाणपुलाजवळ रविवारी रात्री झालेल्या हाणामारीप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार संदीप विठ्ठल जाधव, जखमी मार्शल ऊर्फ बाबू मुकुंद गर्देसह 30 जणांवर सोमवारी गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामध्ये तीन पोलिस व जखमी गर्देच्या साथीदारांचा समावेश आहे. दोन्ही गटाकडून परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.

दाभोळकर कॉर्नरवरील घटनेची गंभीर दखल घेत अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले. हाणामारीत सहायक फौजदार संदीप जाधव, अन्य तीन पोलिस कान्स्टेबल यांचा दोष आढळून आल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

मार्शल गर्दे यांनी दिलेल्या फिर्यादीत सहायक फौजदार जाधवसह दोन अनोळखी गणवेशातील पोलिस व अन्य तीन जणांनी फायबर काठीने सर्वांगावर, इतरांनी लाथ्या-बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेनंतर काहीवेळाने दाभोळकर कॉर्नरवर आलेल्या गणवेशातील एका पोलिसाने काठीने छातीवर जबर मारहाण केली. हॉटेल अनुग्रह येथून दाभोळकर चौकापर्यंत फरफटत आणून पुन्हा बेदम मारहाण केल्याचे म्हटले आहे. सहायक फौजदार संदीप जाधव (43, लाईन बाजार) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित मार्शल गर्दे व अनोळखी 20 ते 25 साथीदारांनी हॉकी स्टिक, काठ्या व दगडाने मारहाण करून आपणासह दोन पोलिसांना जखमी केले आहे. आपण गुंडाविरोधी पथकात कार्यरत आहे.

शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री पेट्रोलिंग करीत असता मित्र व हॉकी खेळाडू दया पाटील व त्याचे सहकारी, पंच अनुग्रह हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. त्यांना भेटण्यासाठी गेलो असता हॉटेल आवारात काही लोक हातात काठ्या घेऊन भांडण करून आरडाओरड करीत होते. हा प्रकार निदर्शनास येताच भांडणे मिटविण्यासाठी पुढे गेलो असता, संशयित मार्शल गद्रे व अन्य काही जणांनी बेकायदा जमाव करून शिवीगाळ, धक्‍काबुक्‍की केली. हातातील हत्यार व काठीने माझ्यासह मित्र दया पाटील यांनाही मारहाण करून जखमी केले.

या घटनेनंतर शाहूपुरी पोलिस ठाण्याशी संपर्क साधून ड्युटीवरील पोलिसांना घटनास्थळी बोलावून घेण्यात आले असता, संशयितांनी मदतीला आलेल्या पोलिसांना शिवीगाळ करून हुज्जत घातली. शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मार्शल गद्रेला अन्य साथीदारांनी जबरदस्तीने ओढून घेऊन गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.