Wed, Aug 21, 2019 02:16होमपेज › Kolhapur › शहर ‘हाऊसफुल्‍ल’

शहर ‘हाऊसफुल्‍ल’

Published On: Dec 24 2017 1:44AM | Last Updated: Dec 23 2017 11:46PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

नाताळच्या सुट्टीमुळे हिवाळी पर्यटनाला बहर आला आहे. शहरात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. दरदिवशी लाखोंच्या संख्येने शहरात दाखल होणार्‍या पर्यटकांमुळे शहरातील रस्ते गर्दीने फुलले असून सर्व प्रमुख रस्त्यांवर वाहनांची कोंडी जाणवू लागली आहे. शहरातील धर्मशाळा व हॉटेल्स हाऊसफुल्ल झाली आहेत.अंबाबाई मंदिरात आज भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. 

शुक्रवारपासून नाताळची सुट्टी सुरू झाली आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळा महाविद्यालयांना एक आठवडा ते दहा दिवस सुट्टी असल्याने सहकुटुंब पर्यटनासाठी लोक बाहेर पडले आहेत. शुक्रवारी रात्रीपासून शहरात पर्यटक दाखल होण्यास सुरुवात झाली. आज शनिवारीही असेच पर्यटकांच्या गर्दीने शहर फुलले होते. मंदिर परिसरातील सर्व धर्मशाळा भरल्याने पर्यटकांना राहण्यासाठी ठिकाण शोधावे लागत होते. अनेक पर्यटक धर्मशाळांच्या दारात वेटिंगने थांबले होते. 

देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दररोज किमान पन्‍नास हजार भाविक सध्या महालक्ष्मीचे दर्शन घेत आहेत. मंदिरात नवरात्रोत्सवाप्रमाणे गर्दी होऊ लागली आहे. आज शहरातील सर्व पार्किंगची ठिकाणे वाहनांनी भरली होती. सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी कोल्हापूर दर्शनास पसंती दिली आहे. शाळा महाविद्यालयांच्या सहलीसाठीही कोल्हापूरला पसंती लाभत आहे. त्याशिवाय मोठ्या संख्येने पर्यटक आल्याने बाजारातही लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे.

पर्यटकांनी कोल्हापुरी चप्पल, साज, गूळ खरेदीरोबरच कोल्हापुरी भेळ, मिसळसह खास कोल्हापुरी खाद्यपदार्थांवर ताव मारला. खरेदीसाठी महाद्वारसह शहरातील सर्व बाजारपेठा गर्दीने फुलल्या होत्या. याशिवाय शहरातील न्यू पॅलेस, खासबाग, रंकाळ्यासह शहरानजीकच्या जोतिबा, पन्हाळा, नृसिंहवाडी, खिद्रापूर, कणेरीमठ पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. शहरात रंकाळा तलाव, साठमारी, शाहू जन्मस्थळ, न्यू पॅलेस आदी ठिकाणी पर्यटकांची गर्दी दिसून आली. मंदिर परिसरात श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वतीने मोफत अन्नदान उपक्रम राबवला जातो. याठिकाणीही आज पर्यटक भाविकांची मोठी रांग दिसून आली. दररोज किमान नऊ ते दहा हजार भाविक मोफत अन्नप्रसादाचा लाभ घेत असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.