होमपेज › Kolhapur › सहा महिन्यांत तिनशे वाहने चोरीस 

सहा महिन्यांत तिनशे वाहने चोरीस 

Published On: Jul 12 2018 1:41AM | Last Updated: Jul 11 2018 11:29PMकोल्हापूर : गौरव डोंगरे 

दुचाकी पार्किंगला सुरक्षित ठिकाण कोठे, अशी म्हणण्याची वेळ लोकांवर आली आहे. शहरासह जिल्ह्यातील वाहन चोरीच्या वाढत्या घटनांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. मागील सहा महिन्यांत सुमारे 300 वाहनांची चोरी झाली असून, दिवसाला सरासरी तीन वाहने चोरीच्या घटना अलीकडे घडल्या आहेत. तक्रारदारालाही कच्ची नोंद घेऊन मोटारसायकल मिळाल्यानंतर गुन्हा नोंदवू, अशी उलटसुलट उत्तरे पोलिस ठाण्यातून मिळत असल्याने वाहनचोरीने डोकेदुखी आणखीन वाढविली आहे. 

शहरात पार्किंगची मोठी समस्या असल्याने दुचाकी नेमक्या कुठे उभ्या कराव्यात, हा मोठा प्रश्‍न आहे. त्यातच वाढलेल्या वाहन चोरीच्या घटनांनी नागरिक हैराण झाले आहेत. आठवडा बाजाराच्या ठिकाणी तर वाहन चोरट्यांचा सुळसुळाट असतो. त्यातही  मोटारसायकल चोरीचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर येत आहे. या वाहनांची संख्याही सर्वाधिक असल्याने त्याचे स्पेअर पार्ट सुटे करून विकण्याच्या फंडा अनेक चोरट्यांकडून चालविला जातो. 

तक्रार करायची काय गडबड आहे?

शहरातील पोलिस ठाण्यात येणार्‍या ‘दोन दिवस वाहन शोधा, तक्रार करायची काय गडबड आहे’ अशी उलट उत्तरे दिली जातात. तसेच बहुतेक गुन्ह्यात सुरुवातीला कच्ची नोंद करून, नंतर गुन्हा दाखल करण्याचे काम होताना दिसत आहे. 

वरातीमागून घोडे...

वाहन चोरीप्रकरणी एखादा चोरटा सापडला की त्याच्याकडे चौकशी सुरू होते. त्याने कबुली दिलेल्या गुन्ह्यातील वाहन मिळविले जाते. त्याच्याकडून मिळालेल्या वाहनांच्यावरून संबंधित तक्रारदाराचा शोध सुरू होतो. तक्रार नसेल तर त्या वाहन मालकाला पोलिस ठाण्यात बोलावून तक्रार घेतली जाते, असे अनुभव पोलिस ठाण्यात येत आहेत. या कामात पोलिसांचे ‘वरातीमागून घोडे’ अशी अवस्था असल्याचे दिसून येते आहे.शहरातील वाहन चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर नुकतीच पोलिसांच्या वतीने स्क्रॅप विक्रेत्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. वाहनांचे स्क्रॅप विक्री करण्यास कोणी आले तर त्याची माहिती तत्काळ पोलिसांना कळवावी, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.

वाहन चोरीची ठिकाणे 

मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन, सीपीआर रुग्णालय, महाद्वार रोड, ताराबाई पार्क, परीख पूल, राजारामपुरी, शाहूपुरी, शिवाजी स्टेडियम परिसर ही शहरातील वाहन चोरीची नेहमीची ठिकाणे बनली 
आहेत.