Wed, Apr 24, 2019 16:12होमपेज › Kolhapur › फवारणीदरम्यान विषबाधा झाल्यास भरपाई मिळणार

फवारणीदरम्यान विषबाधा झाल्यास भरपाई मिळणार

Published On: Jul 20 2018 1:11AM | Last Updated: Jul 20 2018 12:17AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शेतात कीटकनाशकाची फरवारणी करताना विषबाधा झाली तर यापुढे त्याची भरपाई मिळणार आहे. यासह मानवनिर्मित घटना, आपत्तीतही बाधित नागरिकांना भरपाई देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

कीटकनाशकाची फवारणी करताना मराठवाड्यात अनेक शेतकर्‍यांचा मृत्यू झाला होता. जिल्ह्यातही फवारणीदरम्यान विषबाधा होऊन मृत्यू होण्याचे प्रकार घडले आहेत. अशा प्रकारात मृत्यू झाल्यास आता मात्र, चार लाख रुपयांची भरपाई मिळणार आहे. यासह धार्मिक अथवा सार्वजनिक ठिकाणी चेंगराचेंगरी झाली तर त्यातील मृत्युमुखी पडणार्‍यांना तसेच स्थानिक प्राधिकरणाने नोटीस न दिलेली आणि मोडकळीस अथवा जीर्ण झालेली इमारत कोसळून मृत्यू झाल्यास संबंधितांच्या वारसांना चार लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे.

या घटनांत अपंगत्व आले तर त्यालाही भरपाई मिळणार आहे. 25 ते 39 टक्के अपंगत्व आल्यास 50 हजार रुपये, 40 ते 60 टक्के अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये आणि त्यापेक्षा अधिक अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये भरपाई म्हणून दिले जाणार आहेत. या घटनांत जखमी झालेल्यांना रुग्णालयाचाही खर्च दिला जाणार आहे. पहिल्या तीन दिवसांसाठी 3 हजार रुपये, त्यापुढील प्रत्येक दिवसांसाठी एक हजार रुपये (कमाल 14 दिवस, एकूण 14 हजार रुपये) भरपाई म्हणून दिले जाणार आहेत.