Thu, Jun 20, 2019 21:00होमपेज › Kolhapur › कुरूंदवाड पालिकेत स्वीकृत नगरसेवकसाठी राष्ट्रवादीत भाऊगर्दी

कुरूंदवाड पालिकेत स्वीकृत नगरसेवकसाठी राष्ट्रवादीत भाऊगर्दी

Published On: Jan 11 2018 1:07AM | Last Updated: Jan 10 2018 11:22PM

बुकमार्क करा
कुरूंदवाड : प्रतिनिधी

कुरूंदवाड पालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादी पक्षात भाऊगर्दी झाली आहे. माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील, चंगेजखान पठाण यांनी आपल्या पुत्रासाठी तर पक्षातील आघाडीप्रमुख व पराभूत उमेदवारांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली, मुंबई ते कागल वारीला सुरुवात झाली असून स्वीकृतपदाची संधी कोणाला मिळणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

कुरूंदवाड पालिकेतील स्वीकृत नगरसेवकपद एक वर्षासाठी सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळणार आहे. पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील, तानाजी आलासे यांच्या सौ. तर पक्षाचे शहराध्यक्ष जिन्‍नापा पोवार, चंद्रकांत पोवार यांना अल्पमतात पराभवाला सामोरे जावे लागले होते. काही महिन्यांसाठी का असेना आपली या पदावर वर्णी लागावी, यासाठी त्यांनी कागलसह जयसिंगपूर वार्‍यांना सुरुवात केली आहे.

पक्षातील ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे नेते माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील यांचा पालिकेत एक मोठा गट आहे. त्यांचे सुपुत्र अभिजित पाटील यांना 2011, 16 च्या सभागृहात जनविकास व शहर सुधारणा या संयुक्‍त आघाडीतर्फे स्वीकृत नगरसेवकपदाची संधी मिळणार होती. मात्र, प्रभागातील निवडणुकीत माघार घेण्यासाठी कार्यकर्त्याला दिलेला शब्द पाळण्यासाठी आपल्या मुलाला थांबवत बाबासाहेब भबिरे यांना स्वीकृत नगरसेवकपदाची संधी दिली होती. पाच वर्षांत सत्तेच्या सारीपाटात भबिरे यांचा राजीनामा न झाल्याने अभिजित पाटील यांची संधी हुकली होती. आपल्या मुलाला राजकारणात सक्रिय करण्यासाठी माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटीलसह समर्थकांनी आ. हसन मुश्रीफ, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे फिल्डिंग लावली आहे.  माजी नगराध्यक्ष चंगेजखान पठाण यांच्या कुटुंबातील एक नगरसेवक सभागृहात नेहमी असायचा. या सभागृहात सध्या त्यांच्या कुटुंबातील प्रतिनिधी नसल्याने आपला सुपुत्र शाहरूख खान पठाण यांची वर्णी लागावी, यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. पराभूत उमेदवारांसह माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या सुपुत्रांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मिळावी, यासाठी फिल्डिंग लावली असली तरी ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या सुपुत्रांना संधी मिळवण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तर पक्षातील कार्यकर्त्यांनीही नेत्यांकडे मनधरणीला सुरुवात केल्याने स्वीकृत नगरसेवक पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.