Wed, Nov 14, 2018 04:14होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात 37 वर्षांत सलग 68 दिवसांत विक्रमी 630 मि.मी. पाऊस

कोल्हापुरात 37 वर्षांत सलग 68 दिवसांत विक्रमी 630 मि.मी. पाऊस

Published On: Aug 26 2018 1:39AM | Last Updated: Aug 26 2018 1:34AMकोल्हापूर : विजय पाटील 

यंदा कोल्हापूरचा पाऊस खास आहे. कारण, 17 जूनपासून अपवाद वगळता सलग 68 दिवस पाऊस पडला आणि तोही 630 मि.मी. इतका. 2.5 मि.मी. पाऊस पडला, तर शास्त्रीय भाषेत याला पावसाचा दिवस (रेनी डे) मानला जातो; पण कोल्हापुरात 12 ते 18 मि.मी. इतका दररोज सरासरी पाऊस पडत आहे. 1981 सालापासून म्हणजे तब्बल 37 वर्षांनंतर सलग 68 दिवस पाऊस यंदा पडला असल्याचे निरीक्षण अभ्यासकांनी नोंदवले आहे. त्यामुळे सलग दीर्घकाळ पाऊस बरसल्याच्या विक्रमाची नोंद कोल्हापुरात झाली आहे. 

कोल्हापुरात पाऊस समाधानकारक असतो; पण अलीकडे काही वर्षे पाऊस लहरी बनला होता. अडीच दिवसांत धो-धो पाऊस कोसळून पंचगंगेला पूर आल्याचीसुद्धा अभ्यासकांकडे नोंद आहे. त्यामुळेच कमी वेळेत प्रचंड पाऊस पडून अनेक समस्यांना आमंत्रण मिळत होते. यंदाच्या पावसाने मात्र अनेक गोष्टींची नोंद करण्यास अभ्यासकांना भाग पाडले आहे. अपवाद सोडला तर पाऊस रोज पडत आहे. 12 ते 18 मि.मी. इतका पाऊस पडत असल्याने हा पाऊस जमिनीत पूर्णपणे जिरला आहे. याचा फायदा पुढील काही वर्षे या परिसराला दिसून येईल.सलग पडणारा पाऊस हा अभ्यासकांना आदर्श वाटत असला, तरी शेती पिकांना संकट ठरू शकतो. कारण, यंदाचा पाऊस सलग पडत असल्याने ऊन पडलेले नाही. ऊन नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. शेतात पाणी साचल्याने उसासारखी तग धरणारी पिकेही कुजू लागली आहेत. एकीकडे या सलग पावसाचे हे दुष्परिणाम असताना, दुसरीकडे मात्र विक्रमाची नोंद करून ठेवली आहे.