Wed, Mar 27, 2019 04:41होमपेज › Kolhapur › जूनमध्ये हिवताप विरोधी मोहीम राबविणार : शौमिका महाडिक

जूनमध्ये हिवताप विरोधी मोहीम राबविणार : शौमिका महाडिक

Published On: May 31 2018 1:38AM | Last Updated: May 30 2018 11:14PMकोल्हापूर : प्रतिनिधी

हिवताप, डेंग्यू व चिकनगुनियावर दरवर्षी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येतात. यावर्षीदेखील जून महिन्यामध्ये हिवतापविरोधी मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने महिनाभर ‘एक दिवस, एक कार्यक्रम’ उपक्रम हाती घेण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक व प्रभारी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. उषादेवी कुंभार यांनी दिली.अध्यक्ष सौ. महाडिक म्हणाल्या, हिवतापविरोधी जून महिन्यात राबविण्यात येणार्‍या उपक्रमात खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची सभा, पंचायत राज सदस्यांची तालुकास्तरावर सभा , ग्रामसभा घेण्यात येणार आहेत. प्रत्येक गावामध्ये जलद ताप रुग्ण सर्वेक्षण, औषध फवारणी मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्व गावांमध्ये विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात येणार आहे.  आरोग्य कर्मचारी व स्थानिक लोकप्रतिनिधी, महिला मंडळांच्या सहकार्याने कंटेनर सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

ताप आलेल्या रुग्णांचे रक्‍त नमुने संकलीत करून त्याची तपासणी केली जाते. संशयित डेंग्यू, चिकनगुनिया रुग्णांचे रक्‍तजल नमुने तपासणीसाठी सेंटिनल सेंटरला पाठविले जातात. डेंग्यू रुग्ण आढळणार्‍या गावांमध्ये प्रतिबंधात्मक उपायोजना राबविल्या जातात. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेमुळे हिवतापाचे प्रमाण कमी होत असल्याचे प्रभारी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. उषादेवी कंभार यांनी सांगितले. यावेळी प्रकल्प संचालक डॉ. हरिष जगताप, डॉ. विनोद मोरे, एस. ए. आणुसे, डॉ. फारुक देसाई आदी उपस्थित होते.

हजार गावे, 15 हजार निधी

जिल्ह्यात गावांची संख्या 1030  इतकी आहे. या संपुर्ण गावात हिवतापविरोधी मोहीम राबविण्यात येते. त्यासाठी केवळ 15 हजार रुपये निधी दिला जातो. हा निधी पुरेसा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.