Tue, Mar 26, 2019 21:59होमपेज › Kolhapur › जूनमध्ये २१ लाख टन साखर विक्री

जूनमध्ये २१ लाख टन साखर विक्री

Published On: Jun 08 2018 1:22AM | Last Updated: Jun 08 2018 1:22AMकोल्हापूर : निवास चौगले

देशभरातील साखर कारखान्यांच्या साखर विक्रीवर निर्बंध आणले असून, त्यानुसार जून महिन्यात देशातील सर्व कारखान्यांची मिळून केवळ 21 लाख टन साखर विकता येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी साखर उद्योगासाठी 8500 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल्यानंतर गुरुवारी अन्‍न व औषध प्रशासन विभागाने कारखान्यांतून किती साखर विकता येईल, याचे परिपत्रक काढले.
नुकत्याच संपलेल्या हंगामाच्या सुरुवातीला साखरेचे दर प्रतिक्‍विंटल 3400 ते 3550 रुपये होते; पण त्यानंतर लगेच हे दर कोसळल्याने साखर उद्योगासमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. अलीकडे तर हे दर 2550 ते 2600 रुपयांपर्यंत खाली आले होते.

 यामुळे आर्थिक अरिष्टात सापडलेल्या या उद्योगाला दिलासा देण्यासाठी बुधवारी घेतलेल्या निर्णयामुळे कारखान्यांकडील साखर विक्रीवरही निर्बंध घालण्यात आले. आर्थिक सक्षम कारखाने किंवा खासगी कारखान्यांकडून जादा साखर बाजारात आली, तर त्याचा परिणाम दरावर होण्याची शक्यता गृहीत धरून हे निर्बंध आणले गेले. त्यासंदर्भातील परिपत्रक आज काढले. त्यात जून महिन्यात देशांतर्गत केवळ 21 लाख टन साखर विकता येणार आहे.

एक ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर हे साखर हंगामाचे वर्ष धरले जाते. या एका वर्षात 250 लाख टन साखर विकता येईल. 31 मे रोजी कारखान्यांकडे असलेला स्टॉक व वर्षाचे बारा महिने या सूत्रानुसार साखर विक्रीचे गणित ठरवण्यात आले. त्यानुसार जून महिन्यात 21 लाख टन साखर विकता येणार आहे. यापुढे साखरेची मागणीच घटणार असल्याने पुढील महिन्यात साखर विक्रीचा कोटा कमी होणार आहे.
या निर्णयाचा फटका महाराष्ट्रातील काही साखर कारखान्यांना बसणार आहे. महाराष्ट्रातील बहुंताशी कारखान्यांनी जूनच्या पहिल्याच आठवड्यात मोठ्या प्रमाणात साखर विकली आहे. कारखानानिहाय साखर विक्रीचा कोटा निश्‍चित झाल्याने व एखाद्या कारखान्याचा विक्रीचा कोटा संपला असेल, तर अशा कारखान्यांना जून महिन्यात साखरच विकता येणार नाही. या कारखान्यांना साखर विक्रीसाठी जुलै महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.