Mon, Jun 17, 2019 02:24होमपेज › Kolhapur › हातकणंगले तालुक्यात ‘स्वाभिमानी’मध्ये फूट

हातकणंगले तालुक्यात ‘स्वाभिमानी’मध्ये फूट

Published On: Sep 05 2018 2:13AM | Last Updated: Sep 04 2018 11:34PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला असलेल्या हातकणंगले तालुक्यातच संघटनेत उभी फूट पडली आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन एकेकाळी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेल्या कार्यकर्त्यांनी सवतासुभा मांडण्याचा निर्णय घेतला. विशेषतः संघटनेतील मराठा कार्यकर्त्यांत प्रचंड अस्वस्थता असून रविवारी (दि. 9) पेठवडगाव येथे होणार्‍या मेळाव्यात नाराज गटाची भूमिका जाहीर होणार आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एकीकडे सर्वच राजकीय पक्षात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून त्यांचा उत्साह निर्माण केला जात असतानाच स्वाभिमानीत मात्र नाराजीचे वारे वाहू लागले. आजपर्यंत शेट्टी यांच्या सर्वच आंदोलनात हातकणंगले तालुक्यातील कार्यकर्त्यांचा सहभाग आक्रमकपणे राहिला आहे. 2003 पासून हे कार्यकर्ते शेट्टी यांच्या पाठीशी आहेत. तेव्हापासून सणासुदीच्या काळातही महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपर्‍यात संघटनेचे आंदोलन असेल तर पदरमोड करून या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला आहे. 

अलीकडे शेट्टी यांच्या कार्यपद्धतीवरूनच संघटनेत नाराजी आहे. विशेषतः हातकणंगले तालुक्यात ही नाराजी तीव्र आहे. त्यातही मराठा कार्यकर्त्यांत संघटनेत मिळणार्‍या वागणुकीविषयी असंतोष आहे. काही ठराविक जणांची शेट्टी यांच्या वाहनातून सुरू असलेली ऊठबस, काही गावांत स्थानिक नेत्यांना डावलून दिलेला फंड, कार्यकर्ते भेटल्यानंतर त्यांच्याशी शेट्टी यांच्याकडून धरला जाणारा अबोला आदी कारणे या मागे आहेत. अंबप (ता. हातकणंगले) येथे शेट्टी यांनी आपल्या फंडातून काही निधी दिला, पण त्याची माहिती स्थानिकांना दिली नाही. एवढेच नव्हे तर या निधीतून करण्यात येणार्‍या कार्यक्रमाचे उद्घाटन शेट्टी यांनी जनसुराज्यच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या हस्ते केले. एकीकडे ऊस दरावरून जनसुराज्यचे संस्थापक माजी मंत्री विनय कोरे यांच्याविरोधात आंदोलन करायचे आणि दुसरीकडे बेरजेच्या राजकारणासाठी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मान द्यायचा यामुळे कार्यकर्त्यांच्या नाराजीत आणखीनच भर पडली. त्यातून संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय या कार्यकर्त्यांनी घेतला असून हातकणंगलेसह शिरोळ, शाहूवाडी तालुक्यातील नाराजांशी या लोकांनी संपर्क सुरू केला आहे.

जे कार्यकर्ते गेल्या 15 वर्षांपासून शेट्टी यांच्याशी प्रामाणिक आहेत, त्यांनाच अलीकडे विश्‍वासात घेतले जात नाही. तोंड दाबून बुक्क्यांचा मार कार्यकर्त्यांना सहन करावा लागतो. 10 जानेवारी 2017 रोजी शेट्टी यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती सांगितली, पण तरीही काही फरक न पडल्याने संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील निर्णय रविवारच्या मेळाव्यात जाहीर करू.. शिवाजी माने संघटनेचे कार्यकर्ते, भादोले