होमपेज › Kolhapur › कोल्हापूर ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

Published On: Jul 25 2018 1:37AM | Last Updated: Jul 25 2018 1:16AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चासह इतर संलग्न संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनाला कोल्हापुरातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी आंदोलनाचा अंदाज घेऊन उघडलेली दुकाने मराठा कार्यकर्त्यांच्या रॅलीनंतर पटापट बंद झाली. याशिवाय शाळांना अघोषित सुट्टी, तर शहरातील रिक्षाही बंद राहिल्याने कोल्हापुरात हा बंद कडकडीत झाला. दरम्यान, मुदाळतिठ्ठा येथे पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना मारहाण केल्यामुळे त्यांची पोलिसांशी वादावादी झाली.

दरम्यान, मंगळवारपासून ऐतिहासिक दसरा चौकात मराठा क्रांती मोर्चातर्फे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू झाले. त्याला पाठिंबा देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. ‘जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ,’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. 

दरम्यान, ऐतिहासिक दसरा चौकात पोलिसांनी रॅली काढणार्‍या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने कार्यकर्ते व पोलिसांमध्ये वादावादी झाली. व्हीनस कॉर्नर येथील एक सराफी दुकान उघडे असल्याने ते बंद करण्यासाठी कार्यकर्त्यांनी या दुकानावर किरकोळ दगडफेक केली, त्यानंतर हे दुकान बंद झाले. एस.टी. व केएमटीची वाहतूक सुरू होती; पण त्यावर कोणी दगडफेक केली नाही. बंदची तीव्रता पाहून लोकच घराबाहेर न पडल्याने एस.टी. व केएमटीला अपेक्षित प्रवासी मिळाले नाहीत. परिणामी, काही मार्गांवरील फेर्‍या रद्द कराव्या लागल्या. 

मराठा समाजाला नोकरीसह 

या तरुणाने गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केली.त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रभर उमटले. त्यातून मराठा क्रांती मोर्चासह इतर संंलग्न संघटनांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यात कोल्हापूर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आजपासून दसरा चौकात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनासाठी समाजातील कार्यकर्त्यांनी दसरा चौकात प्रचंड गर्दी केली होती. 

शहरात रॅली

दसरा चौकात जमलेल्या कार्यकर्त्यांनी शहरातून रॅली काढून बंदचे आवाहन करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला या रॅलीला पोलिसांनी विरोध केला. त्यातून कार्यकर्ते व पोलिसांत वादावादी झाली. हा वाद मिटल्यानंतर शहराच्या प्रमुख मार्गांवरून ही रॅली काढण्यात आली. दसरा चौकातून लक्ष्मीपुरी, उमा टॉकिज, कॉमर्स कॉलेज, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, पापाची तिकटी, माळकर तिकटी, शिवाजी चौक, बिंदू चौक, मटण मार्केट, महाराणा प्रताप चौकमार्गे ही रॅली दसरा चौकात आली. या रॅलीमुळे सकाळी बंदचा अंदाज घेऊन अर्धवट उघडलेली दुकाने पटापट बंद झाली. त्यामुळे महाद्वार रोड, गुजरी, चप्पल लाईन, महापालिका चौकात शुकशुकाट पसरला. 

दसरा चौक-स्टेशन रोडवरून पुन्हा रॅली काढण्यात आली. व्हीनस कॉर्नर, दाभोळकर कॉर्नर, राजीव गांधी पुतळा, मध्यवर्ती बसस्थानक, स्टेशन रोडमार्गे ही रॅली दसरा चौकात आली. रॅली परत जाताना व्हीनस कॉर्नर परिसरातील एक मोठे सराफी दुकान उघडे होते. ते बंद करण्यासाठी कार्यकर्त्यांनी या दुकानावर किरकोळ दगडफेक केली. राजारामपुरीतील व्यवहार सकाळपासूनच बंद होते. या परिसरातील काही दुकाने सकाळी उघडी होती; पण तीही कार्यकर्त्यांनी बंद पाडली. 

रॅलीच्या मार्गावर घोषणाबाजी

रॅलीत सहभागी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी-जय शिवाजी’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’ यासारख्या घोषणांनी रॅलीचा मार्ग दणाणून गेला. 

एस.टी.च्या 642 फेर्‍या रद्द;कागल, गारगोटी, कुरूंदवाड आगारांना फटका

महाराष्ट्र बंद आंदोलनाचा सर्वात मोठा फटका एस.टी. महामंडळाला बसला. जिल्ह्यात एस.टी.च्या 6 गाड्या फोडल्या, तर दिवसभरात 642 फेर्‍या रद्द झाल्या. 23 हजार किलोमीटर अंतर रद्द करावे लागले. यामुळे एस.टी.चे अडीच लाखाचे नुकसान झाले. या आंदोनलनाचा प्रवाशांना चांगलाच फटका बसला. 

बंदच्या पार्श्‍वभूमीवर एस.टी. प्रशासनाने सावध पवित्रा घेत गाड्या सोडण्याचे नियोजन केले होते. मार्गावरील आंदोलनाची माहिती घेऊन बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात येत होते. त्यामुळे अनेक प्रवाशांना मध्यवर्ती बसस्थानकात अडकून पडावे लागले. मात्र, मराठा आरक्षणासाठी आंदोलन असल्यामुळे प्रवाशांतूनही बसस्थानकात थांबावयास लागू दे;  पण आरक्षणाचा निर्णय व्हावा, अशी भावना व्यक्त केली जात होती. 

जिल्ह्यात तमदलगे 2, हातकणंगले 2, जयसिंगपूर 1 आणि कुरूंदवाड 1 अशा चार ठिकाणी 6 एस.टी.च्या बसेसवर दगडफेक होऊन नुकसान झाले. 

शाळा परिसरात शुकशुकाट

शहरातील मराठीसह इंग्रजी माध्यमांच्या बहुतांश शाळा बंद राहिल्याने शाळा परिसरात शुकशुकाट होता. काही ठिकाणी शाळा सुरू; पण विद्यार्थी नाहीत, अशी परिस्थिती पाहायला मिळाली. 
शहरात सकाळच्या सत्रात बहुतांश इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू असतात. महाराष्ट्र बंद असल्याने पालक मुलांना शाळेत सोडायचे की नाही, याबाबत संभ्रमात होते. अनेक पालकांनी शाळेशी संपर्क साधून खात्री केली. त्यानंतर काही पालक विद्यार्थांना सोडण्यासाठी शाळेत गेले. मात्र, महाराष्ट्र बंद असल्याने एक दिवसासाठी शाळा बंद ठेवण्यात आल्याचे फलक शाळेत लावल्याचे पाहिल्यानंतर त्यांना परत जावे लागले. रिक्षावाल्या मामांनीही शाळा बंदची माहिती फोनवरून पालकांना दिली. शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वतीने स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या होत्या. 

सकाळी अकरा वाजता मराठी माध्यमाच्या पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळा भरतात. नेहमीप्रमाणे विद्यार्थी शाळेत गेले. परंतु, शाळेला सुट्टी असल्याचे सांगण्यात आले. महापालिकेच्या शाळा सुरू राहिल्या; पण पालकांनी दक्षता म्हणून मुलांना शाळेत पाठविले नसल्याने विद्यार्थी संख्या तुरळक होती. 

मराठा क्रांती मोर्चाचे बेमुदत ठिय्या आंदोलन

मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील आता दुसर्‍या टप्प्यातील आंदोलनास सुरुवात झाली आहे. आज मंगळवारी दसरा चौकामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजित केलेल्या ठिय्या आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अधूनमधून कोसळणार्‍या पावसाच्या सरी, ‘जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ’चा जयघोष, ठिय्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी शहराच्या विविध कोपर्‍यांतून येणारे तरुणांचे जथ्थे, भगवे झेंडे अशा वातावरणात ‘हक्कासाठी मराठ्यांच्या आता लढायचं... आरक्षण घेतल्याबिगर नाही थांबायचं...’ असा निर्धार करत आजपासून बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात झाली. शासनाने मराठ्यांसाठी त्वरित आरक्षण जाहीर करावे; अन्यथा होणार्‍या परिणामांची जबाबदारी शासनावर राहील, असा इशारा देण्यात आला.

आंदोलनासाठी मुस्लिम बोर्डिंगसमोर भव्य मंडप घालण्यात आला आहे. सकाळपासूनच आंदोलनासाठी कार्यकर्ते दसरा चौकामध्ये जमत होते. येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनास सुरुवात झाली. दुपारपर्यंत कार्यकर्त्यांनी चौक भरून गेला होता. वाहतुकीची कोंडी होऊ नये याची दक्षता कार्यकर्ते घेताना दिसत होते. अनेकांनी भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर  तोफ डागली. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत असताना त्यांच्यासह पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा देण्यात आला.

यावेळी शाहू महाराज म्हणाले, मराठा आरक्षणाचा विषय शासनापर्यंत पोहोचला आहे; पण त्यांच्याकडून मनापासून हा प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्न दिसत नाही. हे ओळखूनच मराठा समाजाने पावले उचलली पाहिजेत. हा प्रश्‍न सोडवतो, असे सरकारने सांगितले होेते, त्याला साडेतीन वर्षे होऊन गेली, उरलेली दीड-दोन वर्षे बघता-बघता निघून जातील. समाजाची ही एकी मागणी पूर्ण होईपर्यंत कायम ठेवावी लागेल. 

आमदार सतेज पाटील म्हणाले, मराठा आरक्षण लागू करण्यासंदर्भात भाजप सरकारने नेहमीच तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत तातडीने सरकारने लक्ष घालून मराठा समाजाला आरक्षण लागू करावे.

आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, सरकार कोणाचेही असो, मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी गांभीर्य दाखविले नाही. आज आरक्षणाबाबत मागासवर्गीय आयोग, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांच्या न्यायालयात शासनाने चेंडू टाकून मराठा आरक्षणाचा फुटबॉल केला आहे. मराठा समाजाची सहनशीलता संपली आहे. यापुढे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास सरकार जबाबदार राहील.

प्रा. जयंत पाटील म्हणाले, आतापर्यंत मराठा समाजाने शांतपणे आरक्षणाची मागणी केली; पण आता समाजातील तरुणही आक्रमक झाला आहे. हा आक्रमक तरुण शांत बसणार नाही. त्यांच्याकडून काही विपरीत घडण्यापूर्वीच सरकारने आरक्षणाचा निर्णय घ्यावा. 

प्रा. संजय मंडलिक म्हणाले, शांततेच्या मार्गाने आंदोलन करूनही मागणी मान्य होत नसल्यामुळे मराठा समाज अस्वस्थ झाला आहे. ही अस्वस्थता शासनाने समजून घ्यावी. शांततेने चाललेल्या आंदोलनाला चुकीचे वळण देण्याचा प्रयत्न करू नये. 

बार असोेसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस म्हणाले, मागासवर्गीय समितीच्या अहवालाचे केवळ कारण सांगितले जाते. आंदोलनाची तीव्रता अधिक वाढवावी. अ‍ॅड. विवेक घाटगे म्हणाले, मराठा आरक्षण आंदोलकांच्या मागे 18 हजार वकिलांची फौज मागे आहे. आरक्षणाची चर्चा करावयाची असेल तर ती आमच्याशीच झाली पाहिजे. 

माजी आमदार सुरेश साळोखे, सचिन तोडकर, निवृत्त पोलिस उपायुक्त पी. जी. मांढरे, दीपा पाटील, वनिता पाटील, रुपेश पाटील, हर्षल सुर्वे, दिलीप देसाई, संजय पोवार-वाईकर, चैतन्य सरनोबत, कमलाकर जगदाळे आदींची भाषणे झाली.

आंदोलनात महापौर सौ. शोभा बोंद्रे, उपमहापौर महेश सावंत, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, करवीर सभापती राजेंंद्र सूर्यवंशी, चंद्रकांत जाधव, जयेश कदम, प्रा. इंद्रजित सावंत, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, बाबा पार्टे, माजी महापौर स्वाती यवलुजे, नगरसेवक शारंगधर देशमुख, प्रवीण केसरकर, सत्यजित कदम, अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर, शोभा कवाळे, उमा बनछोडे, सरिता मोरे, सचिन पाटील, अर्जुन माने, संजय माहिते, प्रताप जाधव, डॉ. संदीप नेजदार, तोफिक मुल्लाणी, आदिल फरास, इंद्रजित बोंद्रे, अ‍ॅड. प्रकाश मोरे, अ‍ॅड. सुरेश कुराडे, किशोर घाटगे, अ‍ॅड. पी. टी. सडोलीकर, रविकिरण इंगवले, राजू सावंत, उदय भोसले, चारुलता सावंत, महादेव पाटील, सुजित चव्हाण, बी. जी. मांगलेकर, गणी आजरेकर, दिलीप पाटील, भरत रसाळे, संजय घाटगे, संपतराव चव्हाण, अवधूत पाटील, चंद्रकांत बराले, राजू लिंग्रस, अमर समर्थ, जयकुमार शिंदे, सचिन काटकर, राजेंद्र चव्हाण आदी सहभागी झाले होते.