Thu, Apr 25, 2019 21:27होमपेज › Kolhapur › आयपीएल बेटिंग अड्ड्यांवर छापे

आयपीएल बेटिंग अड्ड्यांवर छापे

Published On: Apr 25 2018 12:56AM | Last Updated: Apr 25 2018 12:54AMकोल्हापूर : प्रतिनिधी

दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील आयपीएल टी-20 क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणार्‍या आंतरराज्य रॅकेटचा कोल्हापूर पोलिसांनी छडा लावला. व्हीनस कॉर्नर व बागल चौकातील अड्ड्यांवर पथकाने एकाचवेळी छापे टाकून प्रमुखासह बेटिंग घेणार्‍या  28 जणांना जेरबंद केले आहे. 110 मोबाईल, लॅपटॉपसह साडेतीन लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. क्रिकेट बेटिंग उलाढालीत मोठ्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.  

शाहूपुरी येथील सहाव्या गल्लीतील दशरथ निकम याच्या मालकीच्या दशरथ अपार्टमेंट व राजाराम रोडवर कमलकृष्ण अपार्टमेंटमधील गाळा क्रमांक पाचमधील अड्ड्यावर हे छापे घालण्यात आले.बेटिंगचा मालक गणेश योगेश काटे (पाचवी गल्ली, शाहूपुरी), विकास संभाजी पाटील (शिवाजी पेठ), अमोल गणपती पोतदार (खरी कॉर्नर), वाशीम युनूस खली (बालगोपाल तालीमजवळ), अस्लम अक्सरअल्ली कांडगावे, नीलेश शंकर परदेशी (जुना बुधवार पेठ), निशिकांत दत्तात्रय कनवाडे, विक्रम पोपट गायकवाड (बुधवार पेठ), संतोष भालचंद्र पेंडूरकर (तेली गल्ली), रोहित प्रदीप बनसोडे, हरिहर शिवदत्त सावंत, प्रवीण शामराव महापुरे (राजारामपुरी), अमित कौतुक राणे (मंगळवार पेठ), विकी सुरेंद्र बनसोडे (पाचवी गल्ली, शाहूपुरी), अनिकेत आनंदराव निंबाळकर, महेंद्र बाबुराव दामुगडे (कदमवाडी), सागर बाबुराव पाटील, उमेश रमेश गोंजारे (सहावी गल्ली), सुनील भिकाजी घाटगे (लक्षतीर्थ वसाहत), इम्रान आदम जमादार (शाहूपुरी), सुदर्शन पांडुरंग किरूळकर (राजारामरोड), ओंकार महादेव चौगुले (डफळे कॉलनी, उचगाव), नितीन सुभाष पाटील (मंगळवार पेठ), प्रकाश दुंडाप्पा गुडसे (उचगाव), रोहित रवींद्र मोरे (जुना बुधवार पेठ), उत्तम रमेश गोजारे (राजारामपुरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

आयपीएल टी-20 क्रिकेट सामन्यासाठी शाहूपुरी व राजारामरोड येथे बेधडक सट्टा घेण्यात येत असल्याची माहिती पोलिस अधीक्षकांना मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक दिनकर मोहितेंसह टीमला कारवाईचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक दिनकर मोहिते, सहायक निरीक्षक युवराज आठरे, सचिन पंडित यांच्यासह पथकातील पन्‍नासवर पोलिस सहभागी झाले होते.

बेटिंग मालक, साथीदारांवर फसवणूक, कटाचा गुन्हा दाखल

अंगझडतीत मोबाईल, 30 हजार 390 रुपये, जुगाराच्या चिठ्ठ्या हाताला लागल्या, असे दिनकर मोहिते यांनी सांगितले. बेटिंग मालक गणेश काटे, विकास पाटील व अन्य संशयितांविरुद्ध भारतीय दंडविधान संहिता 420, 120 (ब) 201, 34 सह महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4 व 5 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  

राजारामरोडवर बेधडक बेटिंग...मालकासह साथीदार जेरबंद!

राजारामरोडवरील कमलकृष्ण कॉम्प्लेक्समधील गाळा क्रमांक 5 मध्ये आयपीएल क्रिकेट बेटिंग घेण्यात येत असल्याची माहिती मिळाली. पथकाने अड्ड्यावर छापा टाकला. अमोल पोतदार, वाशीम खली, रोहित मोरे, उत्तम गोजारे या चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख 23 हजार रुपये, जुगारी साहित्य हस्तगत करण्यात आल्याचे तपासाधिकार्‍यांनी सांगितले. 

टोळीची पाळेमुळे शोधण्याचे आव्हान

छापा कारवाईत 110 मोबाईलसह सिमकॉर्ड हस्तगत करण्यात आले आहेत. सीमकॉर्डचा बेटिंगसाठी वापर झाल्याचे निष्पन्‍न झाले आहे. सीमकॉर्ड कोणाच्या नावावर आहेत? याचाही शोध घेण्यात येत आहे. त्याचा सीडीआर तपासण्यात येत आहे. संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असे तपासाधिकारी दिनकर मोहिते यांनी सांगितले.

क्रिकेट बेटिंगच्या माध्यमातून  कोट्यवधीची उलाढाल शक्य

कोल्हापुरातील आयपीएल टी-20 क्रिकेट बेटिंगचे दोन्ही अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. बेटिंग अड्डे किती दिवसांपासून सुरू आहेत याचीही सखोल चौकशी करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत कोट्यवधीची उलाढाल झाली असावी, असा वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांचा संशय आहे.

घरांची झाडाझडती : धास्तीने एजंट पसार

बेटिंग अड्ड्यांवरील कारवाईनंतर  इचलकरंजी, शहापूर, पेठवडगाव, जयसिंगपूर, शिरोळ, हुपरी, कागल, चंदगड, मलकापूर येथील बेटिंग मालक धास्तावले आहेत. पोलिस रेकॉर्डवरील काही संशयितांच्या घरांची मध्यरात्री झडतीही घेण्यात आली. कारवाईची चाहूल लागताच संशयित पसार झाले होते, असेही सांगण्यात आले.


Tags : Kolhapur, Impressions, IPL, betting, bases