होमपेज › Kolhapur › फरारी सावकारांच्या शोधासाठी छापे; कोल्हापूर पोलिसांची कारवाई

फरारी सावकारांच्या शोधासाठी छापे; कोल्हापूर पोलिसांची कारवाई

Published On: Aug 19 2018 1:45AM | Last Updated: Aug 19 2018 1:39AMकोल्हापूर : प्रतिनिधी

 टाकाळा येथील खाद्यतेल व्यापारी उमेश रामेश्‍वर बजाज आत्महत्याप्रकरणी फरारी सावकार टोळीतील संशयितांना जेरबंद करण्यासाठी राजारामपुरीसह स्थानिक गुन्हे अन्वेषणने सांगलीतील माळी गल्ली, वखारभाग व मिरजेत छापा टाकून शोध घेतला मात्र त्यांचा छडा लागला नाही.

दरम्यान, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी व्यापारी आत्महत्याप्रकरणी तपासाधिकारी औदुंबर पाटील यांच्याकडून शनिवारी सायंकाळी तपासाचा आढावा घेतला. फरारी सावकारांना तातडीने अटक करून त्यांच्याविरुद्ध भक्‍कम पुरावे उपलब्ध करण्याचे आदेश दिले आहेत.पोलिस अधीक्षकांच्या सूचनेमुळे तपास यंत्रणा अधिक गतिमान करण्यात आल्याचे तपासाधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

व्यापारी उमेश बजाज आत्महत्याप्रकरणी सांगलीतील माळी गल्लीत राहणार्‍या भाऊसाहेब माळी, वखारभागातील खाद्यतेल व्यापारी सचिन ढबू, महेश शिंदे, निखिल महाबळसह आठ साथीदारांविरुद्ध राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शारीरिक, मानसिक त्रासाला कंटाळून व्यापार्‍याचीआत्महत्या

 दुर्दैवी व्यापारी उमेश बजाज आत्महत्याप्रकरणी त्यांचे बंधू दिलीप दामोदर बजाज (वय 58, रा. माळी कॉलनी, टाकाळा) यांनी दिलेल्या फिर्यादीत सावकार भाऊसाहेब माळी, सचिन ढबूसह साथीदारांकडून झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासासह धमकीसत्रामुळे भावाने राहत्या घरात गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. दि.3 ऑगस्टला ही घटना घडली होती.

सावकारांच्या शोधासाठी माळीगल्ली, वखारभागात छापा

 तपास पथकाने  राममंदिर  रोडवरील माळी मंडप डेकोरेटर्सचे दुकानासह माळी गल्लीत छापा टाकून भाऊसाहेब माळीचा शोध घेतला. याशिवाय वखारभाग येथील जैन मंदिराजवळील एस. एस. इंटरप्रायझेज या खाद्यतेल घाऊक व्यापारी दुकानावर छापा टाकून संशयिताचा शोध घेण्यात  आल्याचे पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितले. संशयित सावकाराविरुद्ध भक्‍कम पुरावे उपलब्ध करण्यात आल्याचे ते म्हणाले.

अटकपूर्व जामिनासाठी सावकारांच्या हालचाली
 

आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या भाऊसाहेब माळी, सचिन ढबूसह अन्य संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धावाधाव सुरू केली आहे. संशयितांच्या नातेवाईकांचा कसबा रोडवरील जिल्हा न्यायसंकुल आवारात शनिवारी दिवसभर वावर दिसून येत होता. तपासाधिकारी औदुंबर पाटील, सहायक फौजदार राजू वरग, तानाजी सुंभे यांनी बजाज यांच्या घरी आज सकाळी पंचनामा केला.

दहशतीच्या बळावर व्याजासह वसुली

जानेवारी 2017 ते मार्च 2017 काळात व्यापारी उमेश बजाज यांनी दरमहा 5 ते 7 टक्के व्याजदराने भाऊसाहेब माळीकडून 33 लाख रुपये घेतले होते. त्यापैकी 29 लाख 75 हजार रुपये परत केले आहेत. महेश शिंदेकडून 9 लाख घेतले होते. 7 लाख 65 हजार रुपयांची परतफेड होऊनही सावकाराकडून तगादा सुरू होता; असेही तक्रारदार दिलीप बजाज यांनी फिर्यादीत नमूद केले आहे, असेही औदुंबर पाटील यांनी सांगितले.