होमपेज › Kolhapur › नव्या पिढीला उमगतंय रानभाज्यांचे महत्त्व 

नव्या पिढीला उमगतंय रानभाज्यांचे महत्त्व 

Published On: Sep 11 2018 1:36AM | Last Updated: Sep 10 2018 11:50PMकोल्हापूर : सागर यादव 

निसर्गात उगविणार्‍या बहुगुणी रानभाज्यांच्या विविधतेचा खजिना आजही खुला आहे; पण कालौघात याचा विसर माणसाला पडला होता. या रानभाज्यांचे महत्त्व आणि मोल पटवून देणारी विशेष मोहीम पर्यावरणाच्या जतन-संवर्धन-संरक्षणाचे कार्य करणार्‍या निसर्गमित्र संस्थेने गेल्या नऊ वर्षांपासून अखंड सुरू ठेवली आहे. यामुळे बहुगुणी रानभाज्यांचे महत्त्व नव्या पिढीत मोठ्या प्रमाणात रुजल्याने साहजिकच शहरी भागातून रानभाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. 

भाजीपाल्याची निर्मिती करणार्‍या शेतकर्‍यांना रानभाज्यांबाबत विचारणा होत असल्याने ग्रामीण लोकांकडून नेहमीच्या भाज्या सोडून विस्मृतीत गेलेल्या, दुर्लक्षित रानभाज्याची शोधमोहीम राबवावी लागत आहे. 

प्राचीन काळापासून या रानभाज्यांचा वापर मानवाकडून केला जात होता. कालौघात आधुनिक पिढीला भारतीय पर्यावरणपूरक खाद्यसंस्कृतीचा विसर पडल्याने बहुगुणी आणि शरीरास अत्यावश्यक असणार्‍या रानभाज्या बाजूला गेल्या. शिवाय, मानवी वसाहती, सिमेंटची जंगले, प्रदूषणासह विविध कारणांमुळेही रानभाज्यांसह विविध प्रकारच्या वनस्पती नष्ट झाल्या. 
‘बाजारात विकत न मिळणार्‍या भाज्या’ या अटीवर झालेल्या स्पर्धेत तब्बल 74 प्रकारच्या रानभाज्यांसह लोकांनी उत्स्फूूर्त सहभाग नोंदविला. कोणीही लागवड करीत नाही, कसलेही खत लागत नाही, कुठल्याच कीटकांचा प्रादूर्भाव होत नाही, अशा शब्दश: ‘आपोआप’ उगविणार्‍या आरोग्यदायी रानभाज्यांची ओळख नव्या पिढीला व्हावी, या उद्देशाने संस्थेतर्फे ‘ओळख रानभाज्यांची’ ही माहिती पुस्तिका तयार करण्यात आली. 

ज्येष्ठ वनस्पतीतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर, वैद्य अशोक वाली यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक रानभाज्यांची इत्थंभूत सचित्र माहिती संकलित करण्यात आली. रानभाज्यांचे महत्त्व जनमानसात रुजविण्यासाठी निसर्गमित्र अनिल चौगुले, दिनकर चौगुले, पराग केमकर, अभय कोटणीस, राणिता चौगुले व सहकार्‍यांनी ऋतुमानानुसार रानभाज्यांच्या नोंदी ठेवणे, रोपे तयार करणे अशी कृतिशील मोहीम सुरू ठेवली. याला लोकांचे उत्स्फूर्त भक्‍कम पाठबळ मिळाले.

रानभाज्या जतनाची मोहीम

पर्यावरणातील महत्त्वपूर्ण घटक असणार्‍या रानभाज्यांच्या जतन-संवर्धन-संरक्षणाच्या उद्देशाने निसर्गमित्र संस्थेने 2010 ला कृतिशील मोहीम हाती घेतली. शहरी व ग्रामीण भागांसाठी ‘रानभाज्या पाककृती’ स्पर्धा आयोजित केल्या. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.