Mon, Jun 17, 2019 02:45होमपेज › Kolhapur › अपघातग्रस्तांना मिळणार तत्काळ मदत

अपघातग्रस्तांना मिळणार तत्काळ मदत

Published On: Apr 23 2018 1:50AM | Last Updated: Apr 22 2018 11:38PMकोल्हापूर : अनिल देशमुख

अपघातांतील जखमींना योग्यवेळी आणि योग्य पद्धतीची मदत मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. अपघातात होणारे मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास यामुळे मदत होईल, याद‍ृष्टीने अपघात प्रवण क्षेत्राजवळील ग्रामस्थ आणि अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्याचा प्रशासनाचा विचार आहे.जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण अधिक आहे. दररोज लहान-मोठ्या चार ते पाच अपघातांची नोंद होत असते. अपघातांत मृत्यू होणार्‍यांचेही प्रमाण अधिक आहे. अनेकदा जखमींना योग्य आणि वेळेवर मदत न मिळाल्याने 80 टक्के मृत्यू होत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. अपघातांतील जखमींना वेळेत आणि योग्य पद्धतीची मदत मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत.

या उपक्रमामुळे अपघातांतील मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. यामुळे हा उपक्रम राबविण्याबाबत विचार सुरू असल्याचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सांगितले. प्रशिक्षण कशाप्रकारे द्यायचे, त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद आदी सर्व बाबींचा विचार करून याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गत नागरिकांत जागृती केली जाणार आहे. अपघातानंतर प्राथमिक पातळीवर काय करावे लागते, हेच अनेकदा माहीत नसल्याने योग्य मदत करता येत नाही. या उपक्रमामुळे योग्य मदत मिळू शकेल, असा विश्‍वास निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी व्यक्‍त केला.

जिल्ह्यात 76 अपघात प्रवण क्षेत्रे

जिल्ह्यात 76 अपघात प्रवण क्षेत्रे आहेत. यासह 93 ठिकाणे अपघाताची ठिकाणे म्हणून परिचित आहेत. ही ठिकाणे निश्‍चित केली जाणार असून, त्या परिसरातील ग्रामस्थ आणि प्रशासकीय यंत्रणेची सांगड घालून मदत पथके तयार केली जाणार आहेत.

तरुणांचा सहभाग वाढवणार

अपघात प्रवण क्षेत्राजवळील गावांतील तरुणांची यासाठी मदत घेतली जाणार आहे. गावांतील उत्साही, सामाजिक कामात उत्सुक असलेल्या, तसेच सहजपणे उपलब्ध होणार्‍या तरुणांची यादी तयार केली जाईल. त्यांचे दूरध्वनी, मोबाईल क्रमांक उपलब्ध असतील. त्यांना तसेच त्या परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्र, स्थानिक तलाठी, ग्रामसेवक, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी प्रशासकीय यंत्रणेेतील अधिकार्‍यांना अपघातांतील जखमींना कशाप्रकारे मदत करता येईल, याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येईल.

गावांत प्रथमोपचाराचे साहित्य ठेवणार

या उपक्रमांतर्गत या क्षेत्राशेजारील गावांत प्राथमिक उपचाराच्या साहित्याचे किट ठेवण्यात येणार आहे. त्याचीही माहिती या फलकावर असल्याने त्याचा जखमींसाठी वापर करता येणार आहे.

अपघात प्रवण क्षेत्रात फलक

या उपक्रमांतर्गत अपघात प्रवण क्षेत्राजवळ दोन फलक लावण्यात येणार आहेत. यापैकी एका फलकावर स्थानिक, तसेच जिल्हा पातळीवरील प्रशासकीय यंत्रणेतील आवश्यक दूरध्वनी, मोबाईल क्रमांक असतील. स्थानिक मदत करणार्‍यांचेही क्रमांक त्यावर असतील. दुसर्‍या फलकावर अपघातातील जखमींना मदत कशी करायची, याबाबतची शास्त्रोक्‍त माहिती सचित्र पद्धतीने दिलेली असेल. यामुळे रस्त्यावरील अन्य नागरिकांनाही जखमींना योग्य पद्धतीने मदत करता येणार आहे.

Tags : Kolhapur, Immediate, relief, casualties