Sun, Aug 25, 2019 19:02होमपेज › Kolhapur › क्रीडा स्पर्धा नियोजनाकडे दुर्लक्ष

क्रीडा स्पर्धा नियोजनाकडे दुर्लक्ष

Published On: Jul 23 2018 1:08AM | Last Updated: Jul 22 2018 11:02PMकोल्हापूर : सागर यादव 

शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी राज्य शासनाच्या क्रीडा विभागाच्या वार्षिक बजेटमध्ये तालुका व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांसाठीची तरतूद करण्यात आली आहे. असे असतानाही जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून स्पर्धा नियोजनाकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्या कारभाराबाबत विद्यार्थी खेळाडूंच्या पालकांकडून नाराजी व्यक्त  होत आहे. 

शालेय क्रीडा स्पर्धा जुलैमध्ये सुरू होत असल्या तरी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच जून महिन्यातच त्याच्या नियोजनाबद्दल बैठकांचे आयोजन केले जाते. शहर आणि तालुकास्तरावर बैठका आयोजित केल्या जातात. मात्र, या बैठका केवळ संघ व खेळाडू नोंदणी आणि स्पर्धांच्या वेळापत्रकापुरतीच असल्याचे दिसते. प्रत्यक्ष स्पर्धेची कोणत्याही प्रकारची तयारी मैदानावर होत नसल्याचे वास्तव आहे. यामुळे मैदानात खेळणार्‍या खेेळाडूंना समस्यांना तोंड द्यावे लागते.

खेळनिहाय निधीची तरतूद... 

राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्याला शालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी खेळनिहाय निधी दिला जातो. तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य स्पर्धेसाठी वेगवेगळ्या निधीची तरतूद असते. खेळनिहाय 5, 10, 15 आणि 30 हजार रुपयांचा निधी दिला जातो. तालुका स्तरासाठी सुमारे 6 लाख, जिल्हास्तरावर सुमारे 7 ते 8 लाख आणि विभाग स्तरावर सुमारे 6 ते 7 लाखांचा निधी यासह राज्यस्तरीय स्पर्धेसाठीच्या निधीची तरतूद स्वतंत्र असते. मनपास्तर स्पर्धेसाठी महापालिका प्रशासनाकडून स्वतंत्र बजेटची व्यवस्था असते. 

42 अनुदानित क्रीडा प्रकारांसाठी 5 हजारांपासून ते 30 हजारांपर्यंत खेळनिहाय निधी दिला जातो.  याशिवाय, या निधीत खेळाडू व संघ प्रवेश शुल्कातून मिळणार्‍या रकमेचीही भर असते.