होमपेज › Kolhapur › अज्ञान, भीतीपोटी सापांची हत्या

अज्ञान, भीतीपोटी सापांची हत्या

Published On: Jun 11 2018 1:06AM | Last Updated: Jun 10 2018 11:14PM



कोल्हापूर ः प्रतिनिधी 

वाढत्या लोकसंख्येमुळे शहराला लागून असणार्‍या शेतजमिनींमध्ये प्लॉट पाडून घरे बांधण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे याठिकाणी असणार्‍या सापांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न गंभीर बनू लागला आहे. अज्ञान, भीतीपोटी सापांची हत्या केली जात आहे. 

कोल्हापूर शहराजवळ पाडळी, नागदेववाडी, बालिंगा, शिंगणापूर, हणमंतवाडी, पीरवाडी, कळंबा, पाचगाव आदी गावांची शेतजमीन आहे. शहरात कामानिमित्त  आलेल्या अनेकजणांनी या गावच्या हद्दींमध्ये प्लॉट घेऊन घरे बांधली आहेत. गेल्या काही वर्षांपासून या घरांची संख्या वाढत आहे. त्यामुळे येथील शेतांमधील असलेल्या सापांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न गंभीर बनू लागला आहे. 

विक्रीसाठी शेतजमीन एन.ए. केल्यानंतर सर्वप्रथम प्लॉट पाडले जातात. त्यावेळी सपाटीकरण, रस्ते करत असताना अनेक सापांचा बळी जात आहे. त्यानंतर प्रत्यक्ष त्या जागांवर  घरे बांधल्यानंतर परिसरात असलेल्या सापांवर भीतीपोटी हल्ले करून त्यांना संपविण्याचे काम सुरू आहे. अनेक नैसर्गिक ओढ्यांजवळ बांधकामे होऊ लागली आहेत. त्यामुळे येथे असणार्‍या सापांच्या जीवालादेखील धोका निर्माण होऊ लागला आहे.

पर्यावरणात सापांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतामध्ये साप असल्यास तो उंदीर खातो. त्यामुळे धान्याची नासाडी कमी होण्यास मदत होते. साप हा शत्रू नसून तो शेतकर्‍याचा मित्र आहे. तो कधीही डूख धरत नाही. भीतीपोटी आपण त्याला मारणे चुकीचे आहे हे अनेकांना माहीत असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते.घरात वा घराच्या परिसरात तसेच शेतात साप पाहून भीती वाटते. पण त्याला त्रास दिला नाही व त्याला त्याच्या वाटेने जाऊ दिले तर त्याच्याकडून माणसाला कोणताही धोका नसतो. तरीही अनेकजण सर्पहत्या करतात.

थिमेटचा वापर प्रभावी

नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हा काळ सापांसाठी मीलन काळ असतो. अशा वेळी त्यांची हत्या झाल्यास त्या प्रजातीच्या अस्तित्वावर प्रश्‍नचिन्ह निर्माण होऊ शकते. उन्हाळ्यात तर गारव्याच्या शोधात साप  बाहेर पडतात. अनेकवेळा ते घराच्या सावलीचा अथवा घराच्या भिंतीच्या गारव्याचा आधार घेतात. अशावेळी त्यांना मारण्याऐवजी थिमेटचा वापर प्रभावी ठरतो. थिमेटच्या उग्र वासाने काही दिवस तरी साप त्या परिसरात फिरकत नाहीत. जिल्ह्यात नाग, धामण, घोणस, चापडा, मण्यार, म्हांडुळ, पाण्यातील वेरूळा, थरूड असे सापाचे विविध प्रकार आढळतात. काळ्या रंगाचा नाग क्वचितच आढळतो. कोल्हापूर परिसरात तपकिरी रंगाचे नाग जास्त प्रमाणात  आहेत, बालिंगा, पाडळी, साबळेवाडी, नागदेववाडी, दोनवडे, खुपिरे या भागात विषारी नाग मोठ्या प्रमाणावर आढळतात. त्यांना पकडल्यानंतर बालिंगा नदी परिसरात आम्ही सोडतो, असे सर्पमित्र सागर वाडकर यांनी सांगितले.