Sat, Aug 24, 2019 22:24होमपेज › Kolhapur › बारावीनंतर नियोजन केल्यास यूपीएससीची संधी : जाधव

बारावीनंतर नियोजन केल्यास यूपीएससीची संधी : जाधव

Published On: May 29 2018 1:39AM | Last Updated: May 29 2018 12:43AMकोल्हापूर : प्रतिनिधी

स्पर्धा परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांकडे आत्मविश्‍वास, संयम आणि सकारात्मक द‍ृष्टिकोनाची आवश्यकता आहे. या गुणांबरोबर बारावीनंतर योग्य नियोजन करून अभ्यास केल्यास विद्यार्थी निश्‍चित यशस्वी होऊ शकतोे, असे प्रतिपादन पुणे येथील युनिक अ‍ॅकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव यांनी केले.‘पुढारी एज्यु- दिशा 2018’ या प्रदर्शनात आयोजित व्याख्यानमालेत ‘बारावीनंतर पदवीकाळात यूपीएससीची तयारी’ या विषयावर जाधव यांनी मार्गदर्शन केले. कमला कॉलेज परिसरातील डॉ. व्ही. टी. पाटील मेमोरियल हॉल प्रांगणात व्याख्यान झाले. जाधव यांचे स्वागत दै. ‘पुढारी’ चे सहायक सरव्यवस्थापक (प्रशासन) राजेंद्र मांडवकर यांनी केले. 

जाधव म्हणाले, देशभरात यूपीएससीची परीक्षा देण्यासाठी पाच-सहा लाख विद्यार्थी इच्छुक असतात. त्यापैकी 3 ते 4 लाख विद्यार्थी पूर्वपरीक्षा देतात. यातून 13 हजारजण मुख्य परीक्षेस पात्र होतात. 13 हजारमधून मुलाखतीसाठी 3 हजार जणांना पात्र केले जाते. या 3 हजारांतून एक हजारजणांना निवडले जाते. याचा अर्थ यूपीएससी परीक्षा सहज जाता जाता देतो असे मानणार्‍यांसाठी नाही. तर द‍ृढनिश्‍चय करुन ही परीक्षा द्यायला हवी. बारावीनंतर आवडत्या अभ्यासक्रमांत पदवी घ्या. पदवी घेत असताना यूपीएससी परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांनी काही गोष्टी आत्मसात करायला हव्यात. यूपीएससी अभ्यासक्रमाचे स्वरूप समाजावून घ्या. या अभ्यासक्रमाचे योग्य आकलन करून घ्यावे. अभ्यासक्रमाशी निगडित संदर्भ पुस्तके, दररोज वर्तमानपत्राचे वाचन नियमीत करायला हवे. परफेक्ट नियोजन करावे आणि आपल्या क्षमतांचा विकास करत न्यावा. यूपीएससी अभ्यासक्रम हा विस्तारीत आहे. त्यामुळे बर्डन पेलण्याची क्षमता विकसित करायला हवी. कोणत्याही स्थितीत डळमळीत होता कामा नये. यूपीएससी परीक्षेचे माईंड ओळखायला हवे. जाधव यांनी व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांना सविस्तर उत्तरे दिली.