Sat, Jul 20, 2019 12:56होमपेज › Kolhapur › शिक्षकच नाहीत तर विद्यार्थी शाळेत का पाठवायचे?

शिक्षकच नाहीत तर विद्यार्थी शाळेत का पाठवायचे?

Published On: Aug 04 2018 1:34AM | Last Updated: Aug 03 2018 11:54PMआजरा : ज्योतिप्रसाद सावंत

आजरा तालुक्यातील जि. प. च्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागांचा प्रश्‍न मार्गी लागत नसल्यामुळे शाळांमध्ये शिक्षकच नसतील तर आम्ही विद्यार्थी का पाठवायचे? असा प्रश्‍न आता पालक उपस्थित करत आहेत. शिक्षकांच्या रिक्त जागांचा परिणाम विद्यार्थी संख्येमध्ये घट होण्यास कारणीभूत ठरत आहे.

चालू शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तब्बल दीड महिन्याचा कालावधी पुर्ण झाला असला तरी तालुक्यातील विविध शाळांमधील रिक्त पदांचा प्रश्‍न अद्यापही सुटलेला नाही. आजरा तालुक्याकरिता केंद्रप्रमुखांची 11 पदे, मुख्याध्यापकाची 13 पदे, विषय शिक्षक/पदवीधर अध्यापकाची 121 पदे तर मदत अध्यापकाची 290 पदे अशी एकूण 435 पदे मराठी माध्यमाकरिता व उर्दू माध्यमाकरिता 11 पदे मंजूर आहेत. यापैकी चाफवडे, भादवण, गवसे, इटे, कानोली, उत्तूर, शिरसंगी, महागोंड येथील केंद्रप्रमुखांची आठ पदे रिक्त आहेत. बहिरेवाडी, देवर्डे, भादवण, पोळगाव या पाच शाळांना मुख्याध्यापक नाहीत.

लाकूडवाडी, सरंबळवाडी, कानोली, कोरीवडे, मेंढोली या शाळांमध्ये विषय शिक्षकांची नेमणूक अद्याप झालेली नाही. तर खोराटवाडी, उचंगी, खेडगे, माद्याळ, आंबाडे, घाटकरवाडी, सातेवाडी, देऊळवाडी, परोलीवाडी, दाभेवाडी, घागरवाडी, दोरुगडेवाडी, देवकांडगाव या शाळांमध्ये मदत अध्यापकांची 13 पदे रिक्त आहेत. उर्दू मराठी विद्यामंदिरमधील मदत अध्यापकाचे एक पद रिक्त आहे. द्विशिक्षकी शाळांमध्ये एकच शिक्षक असल्याने या शाळांमध्ये पहिली ते पाचवी वर्गातील विद्यार्थ्यांकडे एक शिक्षक लक्ष देऊ शकत नाही, असा पालकांचा आरोप आहे. व त्यामध्ये तथ्यही आहे. याच कारणास्तव अनेक पालकांनी आपल्या पाल्यांचा गावातील शाळांव्यतिरिक्त इतरत्र शिक्षणाकरिता प्रवेश घेतला आहे.

आंतरजिल्हा बदली, बदली, जिल्हा बाह्य बदली यासारख्या कारणांमुळे रिक्त झालेल्या शिक्षकांच्या जागी नवीन शिक्षकांची नियुक्ती न झाल्याने तात्पुरत्या स्वरुपात शिक्षक नेमून शैक्षणिक कामकाज रेटण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे; परंतु ही तात्पुरती मलमपट्टी किमान शिक्षणासारख्या क्षेत्रात कितपत लागू पडणार? हा संशोधनाचा विषय आहे. विविध कारणांनी तालुक्यात उपलब्ध असणार्‍या शिक्षकांना इतरत्र जाण्याकरिता मुक्त करण्यात आले आहे; परंतु आता केवळ शिक्षकांचाच नाही तर शिक्षकांशी संबंधित शाळांच्या भवितव्याचा प्रश्‍नही उपस्थित केला जाऊ लागला आहे.
शिक्षण क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी बजावणार्‍या आजरा तालुक्याला शिक्षकांच्या रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. मागूनही शिक्षक मिळत नाही, अशी अवस्था शाळा टिकवू पाहणार्‍या ग्रामस्थांची व पालकांची झाली आहे. याचा परिणाम म्हणून दाखलपात्र विद्यार्थी व प्रत्यक्षात दाखल झालेले विद्यार्थी यामध्ये अलीकडे मोठी तफावत दिसू लागली आहे. यामुळे लाखो रुपये खर्चून बांधलेल्या शाळांच्या इमारती विद्यार्थ्यांअभावी ओस पडू लागल्या आहेत. शिक्षण विभागासह लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास तालुक्याच्या शैक्षणिक दर्जाचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.