Tue, Mar 19, 2019 21:13होमपेज › Kolhapur › युती न झाल्यास काँग्रेस आघाडीचा मुख्यमंत्री

युती न झाल्यास काँग्रेस आघाडीचा मुख्यमंत्री

Published On: Jun 21 2018 1:36AM | Last Updated: Jun 21 2018 1:36AMकोल्हापूर : प्रतिनिधी

भाजप-सेना युती झाली नाही, तर काँगे्रस आघाडीचा मुख्यमंत्री नक्‍की होईल, महाराष्ट्र राज्य जरी गेले तरी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आपलेच आहेत. 21 राज्यांत सत्ताही आपली आहे; पण काँगे्रसवाले मात्र महाराष्ट्राची वाट लावतील, अशी भीती राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्‍त केली.कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील बूथ कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. सुरेश हाळवणकर उपस्थित होते.पाटील म्हणाले, पुढचा मुख्यमंत्री आमचाच असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणत असले, तरी आम्हीही आमचा मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न करणारच आहोत; पण भाजप-सेना एकत्र आल्यास मुख्यमंत्री आमच्यापैकी कोणाचा तरी होईल; पण युती झाली नाही, तर काँगे्रसचा मुख्यमंत्री नक्‍की आहे.

ते म्हणाले, जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदार संघात भाजपची बूथ कमिटी भक्‍कम झाली, तर जिल्ह्यातील दोन खासदार व दहा आमदार कोणाचे असतील, हे भाजपच ठरवेल. समाजातील बहुतांशी वर्ग हा कोणत्याच पक्षाचा नसतो. तुम्ही लोकांना किती किंमत देता, त्यांची किती कामे करता, त्यांच्याशी कसे बोलता, यावर लोक तुमच्या मागे राहणार का नाही, हे निश्‍चित असते. म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या ज्या-ज्या समाजहिताच्या आणि समाजातील तळागाळातील लोकांचा विचार करून तयार केलेल्या योजना आहेत, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम या बूथ कमिटीवर आहे.

आ. हाळवणकर म्हणाले, 2019 ला देशात महायुद्ध होणार आहे. एका बाजूला कर्नाटकच्या सत्ता स्थापनेच्या निमित्ताने एकत्र आलेले दुर्योधन, दुष्यासन व दुसर्‍या बाजूला देशातील सामान्य माणसाचा विचार करून कारभार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी असा हा सामना असेल. महापूर आल्यानंतर ज्याप्रमाणे साप, मुंगुस यासारखे प्राणी आपले अस्तित्व संपेल म्हणून एकत्र येतात, त्याचप्रमाणे हे सर्व विरोधक एकत्र आलेले आहेत. चार वर्षांनंतर मोदी यांनी एक आकडेवारी जाहीर केली. त्यात गेल्या सत्तर वर्षांत देशात फक्‍त 30 टक्के शौचालये होती; पण गेल्या 48 महिन्यांत 83 टक्के शौचालये सरकारने उभी केली. या योजनेची विरोधकांनी खिल्ली उडवली; पण त्या टीकेकडे दुर्लक्ष करून मोदी यांनी हे काम केले. मुंबईचे शांघाय, कोकणचा कॅलिफोर्निया करतो, असे आश्‍वासन दिलेल्या काँगे्रसवाल्यांनी सत्तर वर्षांत जे केले नाही, ते गेल्या चार वर्षांत झाले आहे.

ते म्हणाले, पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात काँगे्रससह विरोधक रस्त्यावर उतरले; पण इंधनाशिवाय कुठल्याही जीवनावश्यक वस्तूची भाववाढ झाली नाही. इंधन जीएसटीखाली आणले, तर प्रतिलिटर ते 15 रुपयांनी स्वस्त होईल. जीएसटी कौन्सिलमध्ये सर्व मुख्यमंत्र्यांची त्याला मंजुरी लागते, ती न मिळाल्याने हा निर्णय प्रलंबित आहे; पण ज्यावेळी हा निर्णय होईल, त्यावेळी काँगे्रसवाल्यांना तोंडाला काळे फासून फिरण्याची वेळ येईल.

मतदार संघातील कार्यकर्ते व व्यासपीठावरील नेत्यांमुळे मी आमदार झालो. गेल्या सत्तर वर्षांत काही झाले नाही, असे मी म्हणणार नाही; पण समाजातील शेवटचा माणूस केंद्रबिंदू मानून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे काम केले, ते गेल्या सत्तर वर्षांत झाले नाही. हेच काम सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम बूथ कमिटीच्या सदस्यांनी करावे, असे आवाहन आ. अमल महाडिक यांनी केले.

यावेळी भाजापचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, संदीप देसाई, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, महिला आघाडीच्या विजया पाटील यांची भाषणे झाली. ‘गोकुळ’च्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल अनिल यादव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई यांनी केले.कार्यक्रमाला स्थायी समिती सभापती आशिष ढवळे, भाजपचे महापालिकेतील गटनेते विजय सूर्यवंशी, ताराराणीचे सत्यजित कदम, माजी महापौर सुनील कदम, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य प्रताप कोंडेकर आदी उपस्थित होते.

टोप्या बदलणारे पवार

रोज एक टोपी बदलणार्‍या शरद पवारांनी मराठा आरक्षणाची टूम काढली; पण महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांपासून ते पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले, त्यांनी कधी मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सोडवला नाही. मराठ्यांच्या चार पिढ्या गेल्या 40 वर्षांत बरबाद झाल्या, त्यावेळी त्यांनी कधी विचार केला नाही, अशी टीकाही हाळवणकर यांनी केली.

...तर बंटी पाटलांना गोल्डमेडल

बूथ कमिटीचे काम महत्त्वाचे आहे. गावागावांत जाऊन सरकारने केलेले काम सांगा. या मतदार संघातील एक नेता सरळ नाही. बुद्धीभेद करण्यात कुणाला गोल्डमेडल द्यायचे झाले तर ते बंटी पाटलांना द्यावे लागेल, अशी टीकाही हाळणवकर यांनी यावेळी केली.

दोघेही पराक्रमी आमदार 

जिल्ह्यात भाजपचे दोन आमदार आहेत. ते पराक्रमी आहेत. हाळवणकरांनी 30 वर्षे आमदार असलेल्यांना घरी बसवले. तर आपण कधीही पराभूत होणार नाही, या अविर्भावात सतेज पाटील यांना अमल महाडिक यांनी पराभूत केल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

शेट्टींचे काम संपले

हाळवणकर यांनी खा. राजू शेट्टी यांच्यावरही टीका केली. केंद्र सरकारने साखर उद्योगाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी काही निर्णय घेतले. या उद्योगाच्या इतिहासात साखरेचा दर कधी निश्‍चित नव्हता, तो केंद्र सरकारने निश्‍चित केला. साखर साठ्यावर नियंत्रण, एफआरपीसाठी पैसे उपलब्ध करून देणे यासारखे निर्णय घेतल्याने आता खा. राजू शेट्टी यांचे काम संपले आहे. म्हणूनच ते ज्या मतदार संघाचे खासदार आहेत, तिथे न थांबता मध्य प्रदेशमध्ये आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांची भेट घेत असल्याचा टोला हाळवणकर यांनी लगावला.

मराठा मोर्चाचे कौतुक

राज्यात मराठा समाजाचे 40 मोर्चे निघाले; पण कुठलीही घोषणा नाही, मोडतोड नाही. आम्ही विस्थापित व मोर्चे प्रस्थापित म्हणजे साखरसम्राट, शिक्षणसम्राट यांच्याविरोधात असल्याचा संदेश या मोर्चातून दिला गेला. मराठा मोर्चाचे एक दडपण मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर होते. त्यातून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत, उद्योगासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून बिनव्याजी कर्ज, या कर्जावरील व्याजही सरकार भरणार अशा काही योजना आम्ही आणल्या. जे काम मराठा मुख्यमंत्र्यांनी केले नाही, ते ब्राह्मण मुख्यमंत्र्यांनी करून दाखवले, असे आ. हाळवणकर यांनी सांगितले.