Tue, Apr 23, 2019 13:34होमपेज › Kolhapur › संधी मिळाल्यास ‘हातकणंगले’तून लढणार : खोत

संधी मिळाल्यास ‘हातकणंगले’तून लढणार : खोत

Published On: Jun 17 2018 1:35AM | Last Updated: Jun 17 2018 12:18AMइचलकरंजी : प्रतिनिधी

ज्यांच्यावर टीका करून राजकारणात स्थिर झाले,  आमदारकी-खासदारकी मिळवली, त्यांच्यासमवेतच आता त्यांनी सूत जुळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. भ्रष्टाचाराने बरबटलेले आता त्यांना पवित्र वाटत असल्याची टीका पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खा. राजू शेट्टी यांच्यावर केली. अशा संधिसाधूंचे पितळ उघड करणे गरजेचे असून संधी मिळाल्यास बहुजन समाजाला सोबत घेऊन हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवू, असे संकेतही खोत यांनी दिले. समाजवादी प्रबोधिनी येथे आयोजित रयत क्रांती संघटनेच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी सुरेश सासणे होते. 

प्रस्थापितांच्या विरोधात गरळ ओकून शेतकर्‍याकडून सहानुभूती मिळवली. धनदांडग्यांच्या विरोधात लढणारा नेता म्हणून स्वत:ची प्रतिमा बनवली. आता धनदांडग्यांसोबतच सलगी वाढवल्याने ही मंडळी आता पवित्र वाटत आहेत. साखरेचे दर निश्‍चित केल्यामुळे ऊस दराच्या आंदोलनाची गरज नाही; मात्र आस्तित्वासाठी आंदोलनाची ते भाषा करत असल्याचा आरोपही खोत यांनी खा.राजू शेट्टी याचे नाव न घेता केली. 

सध्या पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. नदीकाठच्या ग्रामस्थांना दूषित पाण्याचा प्रश्‍न सातत्याने भेडसावत आहे. त्यामुळे पंचगंगा नदी शुध्दीकरणासाठी तातडीने मुंबई बैठक बोलवू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी सागर खोत, जिल्हाध्यक्ष श्रीकांत घाटगे यांची भाषणे झाली. प्रस्ताविक विनायक कलढोणे यांनी केले. सूत्रसंचालन संदीप भातमारे यांनी केले.