Fri, Jul 19, 2019 07:51होमपेज › Kolhapur › प्रकरण वाढवल्यास नोकर्‍या जातील

प्रकरण वाढवल्यास नोकर्‍या जातील

Published On: Jan 31 2018 2:03AM | Last Updated: Jan 31 2018 1:18AMकोल्हापूर :  प्रतिनिधी 

महापालिका चौकातील झाडाला फासावर लटकवू, अशी धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका अनुराधा खेडकर यांचे पती माजी उपमहापौर सचिन खेडकर हे माफी मागायला तयार आहेत. त्यामुळे प्रकरण येथेच संपवा. अन्यथा प्रकरण वाढवल्यास तुमच्या नोकर्‍या जातील, अशी धमकी मंगळवारी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी सिक्युरिटी गार्डना दिल्याची चर्चा महापालिकेत दिवसभर सुरू होती. दरम्यान, सिक्युरिटी गार्डना धमकीची माजी सैनिक संघटनेकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. 

महापालिका चौकात वाहन लावण्यावरून खेडकर यांनी सोमवारी दुपारी मोठा गोंधळ घालून सिक्युरिटी गार्डना धमक्या दिल्या होत्या. माजी सैनिक असलेल्या गार्डना अशाप्रकारे धमक्या दिल्याने कर्मचार्‍यांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. संबंधित सिक्युरिटी गार्डनी त्यांच्या कार्यालयाला कळविल्यावर चौकशी सुरू करण्यात आली आहे. परंतु, खेडकर हे दिलगिरी व्यक्‍त करून माफी मागत आहेत, त्यामुळे प्रकरण वाढवू नये, यासाठी राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांनी पुन्हा सिक्युरिटी गार्डवर दबाव टाकल्याचे सांगण्यात येते. परंतु, सिक्युरिटी गार्डने आम्हाला येथून जास्तीत जास्त दुसर्‍या ठिकाणी नोकरीवर जावे लागेल, असे त्यांना सुनावल्याचे समजते.  

दरम्यान, उपमहापौर सुनील पाटील, काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख, नगरसेवक अर्जुन माने, आशपाक आजरेकर यांच्यासह इतरांनी सिक्युरिटी गार्डची भेट घेतली. नगरसेवक व माजी नगरसेवकांची तुम्हाला ओळख नसल्याने महापालिकेचा एखादा कर्मचारी सोबत ठेवावा, अशी सूचना केली. तसेच खेडकर हे रागाच्या भरात बोलले असतील, त्यांना तुम्ही माफ करावे, अशी विनंती केली. मात्र, सिक्युरिटी गार्डनी आता आमचे वरिष्ठ त्याबाबत ठरवतील, असे त्यांना सांगितले.