होमपेज › Kolhapur › आदर्शवत गणेशोत्सव साजरा करावा

आदर्शवत गणेशोत्सव साजरा करावा

Published On: Aug 26 2018 1:28AM | Last Updated: Aug 26 2018 1:01AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापूरच्या गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे. यंदाही मंडळांनी शांततेेत गणेशोत्सव साजरा करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. कोल्हापूरचा गणेशोत्सव हा राज्यात आदर्श ठरेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन महापौर शोभा बोंद्रे यांनी केले.

पोलिस प्रशासनाच्या वतीने शिवाजी पेठ व मंगळवार पेठेतील गणेशोत्सव मंडळांसाठी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला उपस्थित मंडळांनी दोन बेस व दोन टॉप (साऊंड सिस्टिम) लावण्यास परवानगी मिळावी, अशी आग्रही मागणी केली. सुमारे तीन तास ही बैठक सुरू होती.

आमदार राजेश क्षीरसागर यांनी कायद्याच्या आधीन राहून साऊंड सिस्टिम लावण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी पोलिस प्रशासनाकडे केली. न्यायालयाच्या नियमांच्या आधीन राहून योग्य तो निर्णय घेण्यात यावा, अशी सूचना केली.

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, कोल्हापूर शहरात देखावे, सामाजिक उपक्रम यांसह नावीन्यपूर्ण मिरवणुकीचा पायंडा आहे. लोकप्रतिनिधींच्या भूमिकेचा विपर्यास करून यापूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा अपप्रचार करण्यात आला. मात्र, यंदा प्रशासनाने मंडळांची बाजू समजून घेऊन त्यांना विश्‍वासात घेऊन योग्य मार्ग काढावा. 

पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणाबाबत अत्यंत कडक कायदे केले आहेत. त्याची अंमलबजावणी करणे पोलिसांचे काम आहे. अशावेळी मंडळांनी विरोधी भूमिका न घेता सहकार्य करावे. कार्यकर्त्यांच्या आनंदावर विरझण पडेल, अशी कोणतीही भूमिका पोलिस घेणार नाहीत. विनालाठी गणेशोत्सव पार पडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी डॉ. देशमुख यांनी केले. 

दरम्यान, यावेळी काही सूचनाही करण्यात आल्या. यामध्ये लाला गायकवाड म्हणाले, बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी या मिक्सिंग पॉईंटवर सक्षम अधिकारी नेमावेत.  तर पर्यायी गणेशमूर्ती विसर्जन मार्ग उपलब्ध करावेत, असे अशोक पोवार यांनी सांगितले. विक्रम जरग म्हणाले, महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष पथके नेमण्यात यावीत तर देखावे सादरीकरणाची वेळ वाढवून मिळावी, असे माजी आमदार सुरेश साळोखे यांनी सांगितले. तर साऊंड सिस्टिम, लेझर शोवर अवलंबून कामगारांचा विचार व्हावा, असे सुजित चव्हाण यांनी सांगितले.

  बैठकीला माजी नगरसेवक शहर उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलिस निरीक्षक मानसिंग खोचे, अजित राऊत, दिलीप सावंत, सदाभाऊ शिर्के, मोहन साळोखे, सुहास साळोखे, गणेश साळोखे, पद्माकर कापसे यांच्यासह विविध तालीम संस्था, तरुण मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.