Thu, Feb 21, 2019 16:00होमपेज › Kolhapur › शिवाजी विद्यापीठ प्लास्टिकबंदीच्या पार्श्‍वभूमीवर आदर्शवत

शिवाजी विद्यापीठ प्लास्टिकबंदीच्या पार्श्‍वभूमीवर आदर्शवत

Published On: Jun 23 2018 1:57AM | Last Updated: Jun 23 2018 1:31AMकोल्हापूर : विजय पाटील 

शिवाजी विद्यापीठाचा परिसर म्हणजे सतत विद्यार्थ्यांची, कर्मचार्‍यांची वर्दळ. अपवाद वगळता सतत कार्यशाळा आणि परिषदा सुरू असतात. प्रशासकीय बैठकाही कायम. विद्यापीठाचा परिसर आहे साडेआठशे एकरांचा विस्तीर्ण; पण मागील दोन वर्षांपासून विद्यापीठ आणि परिसरात आदर्शवत वाटावी अशी प्लास्टिकबंदी यशस्वीपणे राबवली जात आहे. अगदी व्हीआयपी पाहुण्यांनाही तांब्या-वाटीतून पाणी दिले जाते. सिनेटच्या सभेतही दोन शिपाई पेल्यातून पाणी देण्यासाठी सज्ज असतात. ‘नो प्लास्टिक’ असं जाहीर करून त्याची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे.

राज्यातील प्लास्टिकबंदीच्या पार्श्‍वभूमीवर शिवाजी विद्यापीठाचं बोलकं उदाहरण निश्‍चितपणे  अनुकरणीय आहे. कारण, जिथं माणसांची वर्दळ जास्त, तिथं प्लास्टिक भरपूर, असं चित्र असत; पण दोन वर्षांपूर्वी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी पुढाकार घेऊन प्लास्टिकबंदी जाहीर करून अंमलबजावणीकडे काटेकोर लक्ष दिले. प्रत्येक कार्यक्रमात व्हीआयपींना बाटलीबंद दिल्या जाणार्‍या पाण्यावरच निर्बंध घालण्यात आले. कर्मचार्‍यांना घरातून पाण्याची बाटली आणण्यास मनाई करण्यात आली. ही अंमलबजावणी यशस्वी व्हावी म्हणून विद्यापीठाने स्वत:चा शुद्ध पाण्याचा प्रकल्प (आर.ओ.) सुरू केला. विद्यापीठातील सर्व अधिकार्‍यांच्या टेबलवर पाण्याच्या बाटलीऐवजी तांब्या-वाटी असते. सर्व कार्यक्रमातील व्यासपीठावर हेच चित्र दिसते. सिनेटच्या बैठकीतही दोन शिपाई जग आणि पेला घेऊन मागेल त्याला पाणी देत असतात. यामुळे प्लास्टिकच्या बाटल्यांचा विषयच परिसरात संपला. दुसर्‍या बाजूला प्लास्टिकच्या बहुतेक गोष्टींवर निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे विद्यापीठाच्या परिसरात प्लास्टिक पिशव्या दिसत नाहीत. कँटिन व हॉस्टेलच्या खानावळीत रॅपरमधून विक्रीच्या पदार्थांनाही बंद घातली आहे. विद्यार्थ्यांकडूनही उत्स्फूर्तपणे या उपक्रमास पाठबळ मिळत आहे.