Tue, Apr 23, 2019 02:31होमपेज › Kolhapur › इचलकरंजीत तरुणाचा भीषण खून

इचलकरंजीत तरुणाचा भीषण खून

Published On: May 05 2018 12:50AM | Last Updated: May 05 2018 12:24AMइचलकरंजी : प्रतिनिधी

पूर्ववैमनस्यातून सशस्त्र हल्ला करून अजित राजाराम एडके (रा. जय सांगली नाका) या तरुणाचा भीषण खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी दुपारी पालिका चौकात घडली. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दोन्ही गटातील आठ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबतची फिर्याद किशोर अशोक शिंदे (वय 19, रा. जयभीमनगर) यांनी दिली आहे. दरम्यान, भरदुपारी पालिका चौकातच पाठलाग करून झालेल्या सशस्त्र हल्ल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता.

जयभीमनगर येथे किशोर अशोक शिंदे हा राहतो. किशोर याचे मामा व भाऊ यांचा अमर पारडे, उदय पारडे, नवनाथ पारसे यांच्याबरोबर वाद झाला होता. हा वाद मिटवण्यात आला होता. किशोर शिंदे व अजित एडके शुक्रवारी दुपारी नगरपालिका चौकात थांबले होते. 

त्यावेळी संशयित अमर पारडे, उदय पारडे, नवनाथ पारसे, बबलू शिंदे, संतोष काळे, बापू कापुरे (सर्व रा. जयभीमनगर) काठ्या घेऊन त्या ठिकाणी आले. पूर्ववैमनस्यातून संशयित तिघांनी किशोर व अजितला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी उदय पारडे कोयता घेऊन किशोर याच्या अंगावर धावून गेला. यावेळी अजित एडके मध्ये पडल्याने त्याच्या डाव्या छातीवर कोयत्याचा गंभीर वार बसला. वार इतका वर्मी होता की, अजित जाग्यावरच कोसळला. यावेळी प्रचंड रक्तस्राव झाला. त्यानंतर संशयित उदय याने किशोरच्या डाव्या पायावर कोयत्याने वार केले. त्यामध्ये किशोरही जखमी झाला. त्यातच संशयित बापू कापुरे याने किशोर शिंदे याला दगड फेकून मारहाण केली. 

भरदुपारी झालेल्या या सशस्त्र हल्ल्यामुळे भागात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. जखमी अवस्थेत अजितला इंदिरा गांधी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर बनल्याने त्याला सांगली सिव्हिल इस्पितळात हलवण्यात आले. उपचारादरम्यान रात्रीच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. मृत्यूची माहिती समजताच जयभीमनगर परिसरात पुन्हा तणाव निर्माण झाला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी मोठा पोलिस फौजफाटा तैनात केला. शिंदे याच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलिसांनी संशयित अमर पारडे, उदय पारडे, नवनाथ पारसे, बबलू शिंदे, संतोष काळे, बापू कापुरे या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

नवनाथ प्रभाकर पारसे (वय 23, रा. जयभीमनगर) याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. बापू कापुरेसह आपण पगार आणण्यासाठी जात असताना नगरपालिका चौकात अमर पारडे व राहुल सोनवणे उभे होते. यावेळी ते अमर पारडे याच्यासोबत बोलत थांबले असता, किशोर शिंदे त्या ठिकाणी आला. भावाला मारताय, तुम्हाला मस्ती आली आहे, जिवंत ठेवत नाही, अशी धमकी देऊन किशोर कोयत्यासह अमर याच्या अंगावर धावून गेला. यावेळी किशोरने केलेला कोयत्याचा वार अमरने चुकवला. त्यावेळी किशोरने पाठलाग करून माझ्या पाठीत वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा वार उजव्या मांडीवर बसल्यामुळे जखमी झालो. याचवेळी अजित एडके याने मला व अमोल कोंडारे याला लोखंडी गजाने मारहाण केली. यावेळी अजित एडके, बलराम शिंदे, साहेबराव शिंदे, अशोक शिंदे, चंद्रकांत कांबळे, आण्णा कांबळे, बुवा, अमोल कोंडारे व तीन ते चार अनोळखी इसमांनी लाथाबुक्क्या व काठीने मारहाण केल्याचे नवनाथने फिर्यादीत नमूद केले आहे.