Fri, Jul 19, 2019 18:07होमपेज › Kolhapur › सांगली मार्गावरील कोंडीने इचलकरंजीकर त्रस्त

सांगली मार्गावरील कोंडीने इचलकरंजीकर त्रस्त

Published On: Aug 06 2018 1:52AM | Last Updated: Aug 06 2018 12:52AMइचलकरंजी : प्रतिनिधी 

येथील डीकेटीई शिक्षण संस्थेच्या अनंतराव भिडे विद्यामंदिर व इंग्रजी माध्यम शाळेचे सांगली रस्त्यावरील कलावंत मळ्यात स्थलांतर झाले आहे. या मार्गावर शरद पॉलिटेक्निक, मुसळे विद्यालय, यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक अशा इतरही शैक्षणिक संस्था असल्याने शाळा, महाविद्यालये भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत इचलकरंजी-सांगली मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. वाहनधारकांनाही शिस्त नसल्याने या कोंडीत भरच पडत चालली असून वाहतूक पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

इचलकरंजी-सांगली रस्त्यावर पूर्वीपासूनच शरद महाविद्यालय, मुसळे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक अशा शैक्षणिक संस्था आहेत. तशातच या शैक्षणिक वर्षापासून राजवाडा चौकातील डीकेटीई शिक्षण संस्थेच्या इमारतीत भरणार्‍या अनंतराव भिडे विद्यामंदिर मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम अशा दोन्ही शाळा यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक समोरील कलावंत मळ्यात स्थलांतरित झाल्या आहेत. त्यामुळे या मार्गावर स्कूल बसेस, विद्यार्थी वाहतूक करणार्‍या रिक्षा, व्हॅन तसेच मुलांना वैयक्तिक मालकीच्या वाहनांतून शाळेत सोडणार्‍यांची वाढती संख्या यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी नित्याची बनली आहे. 

शाळा सुटल्यानंतर तर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असल्याने एस.टी. व इतर वाहनांतून प्रवास करणारे प्रवासी अक्षरश: त्रस्त बनले आहेत. रस्त्यावरच बसेस खिळून राहत असल्याने नोकरदार व इतरत्र शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.