Mon, Jun 24, 2019 17:10होमपेज › Kolhapur › वस्त्रनगरीतील तरुणाई गुन्ह्यांच्या चक्रव्यूहात

वस्त्रनगरीतील तरुणाई गुन्ह्यांच्या चक्रव्यूहात

Published On: May 07 2018 2:02AM | Last Updated: May 07 2018 1:20AMइचलकरंजी : प्रतिनिधी 

इचलकरंजी औद्योगिक नगरी असल्याने तिचा झपाट्याने विस्तार होत आहे. यातूनच भागा-भागांत वर्चस्व राखणार्‍या टोळ्यांचा उदय होत आहे. अशा टोळ्यांकडे घातक शस्त्रे आहेत. त्यांचा वापर किरकोळ वादातही होत असल्याने त्यातून नुकतेच मिसरूड फुटलेल्या युवकांना जग पाहायच्या आगोदरच अखेरचा निरोप घेण्याची वेळ येत आहे. असाच काहीसा प्रकार अलीकडे झालेल्या अजित एडके प्रकरणात घडला. वादातून कोयत्याने हल्ला झाल्याने त्याच्या छातीवर वर्मी घाव बसला. त्यात त्याच्या फुफ्फुसाचे दोन तुकडे झाले. अशा हल्ल्यांनी मृतासह संशयितांच्याही कुटुंबांची वाताहत होत असल्याने तरुणाईचे गुन्हेगारीकडे पडणारे पाऊल वस्त्रनगरीची चिंता वाढवणारे आहे. 

इचलकरंजीचा झपाट्याने विस्तार झाला आहे. नगरपालिका अस्तित्वात असल्याने भागा-भागांत गटा-तटाचे राजकारणही जोरात आहे. यातूनच भागा-भागांत टोळ्यांचा उदय झाला आहे. अशा टोळ्यांकडून दबदबा राखण्यासाठी खुनासारखे टोकाचे पाऊल उचलण्यासही टोळ्यांतील तरुण कचरत नसल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. 

इचलकरंजीत गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून खुनांचे सत्र सुरू आहे. एकामागून एक मुडदे पडल्याने वस्त्रनगरीतील गुन्हेगारीने एक वेगळी क्रूरता अनुभवली. चाकू, तलवार अशा शस्त्रांचा वापर करून मुडदे पाडण्यात आले. त्यानंतर काही खून गोळ्या झाडून करण्यात आले. त्यामुळे गुन्हेगारी टोळ्यांकडे पिस्तूल सहज उपलब्ध असल्याचा आणि पूर्वी केवळ मुंबईसारख्या शहरातच मर्यादित असलेले गँगवॉरचे लोण इचलकरंजीसारख्या निमशहरातही पसरल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला. 

अलीकडील काळात खुनासारख्या घटनांना चांगलाच चाप बसला होता. टोळ्यांतील अंतर्गत वाद धुमसत असला, तरी ‘मोका’सारख्या कठोर कारवाईमुळे गुन्हेगारांना शांत करण्यात मदत झाली होती. परंतु, अजित एडके खून प्रकरणाने पुन्हा एकदा वस्त्रनगरीतील गुन्हेगारीचा अक्राळ-विक्राळ चेहरा पुढे आला आहे. एडके खून प्रकरणाला मुलीची छेड काढण्याच्या वादाची किनार होती. त्यातून एखाद्याचा मुडदा पाडावा इतपत तरुणाई आक्रमक व्हावी, याचेच सर्वांना आश्‍चर्य वाटत आहे. अचानक झालेल्या वादावादीवेळी तरुणांच्या हातात कोयत्यासारखी घातक शस्त्रे येतात कुठून? असा प्रश्‍न सर्वसामान्यांना अस्वस्थ करणारा ठरत आहे. घातक शस्त्रे बाळगण्याची मोठी क्रेझ आजही कायम असल्याचे स्पष्ट होत आहे. मुले घरात शस्त्रे कशासाठी आणतात, याचा विचार पालकवर्गाने करण्याची गरज आहे.