Tue, Jul 16, 2019 22:30होमपेज › Kolhapur › मजुरीवाढीसाठी कामगारांचा प्रांतवर मोर्चा

मजुरीवाढीसाठी कामगारांचा प्रांतवर मोर्चा

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 10 2018 12:52AM

बुकमार्क करा
इचलकरंजी : प्रतिनिधी

मजुरीवाढीच्या मागणीसाठी मंगळवारी यंत्रमाग कामगारांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी, 6 पैसे मजुरीवाढीचा प्रस्ताव तयार असून, मंजुरीसाठी वरिष्ठांकडे सादर केल्याचे सांगितले. तसेच याबाबत लवकरच घोषणा करण्यात येईल. त्यामुळे संप मागे घ्यावा, असे आवाहन केले; मात्र 9 पैसे मजुरीवाढीवर ठाम राहात संप सुरूच ठेवण्याचा निर्णय कामगार नेते मिश्रीलाल जाजू यांनी जाहीर केला.

यंत्रमाग कामगारांना 2013 मध्ये झालेल्या करारानुसार मजुरीवाढ मिळावी यासह विविध मागण्यांसाठी सर्वच कामगार संघटनांनी 1 जानेवारीपासून बेमुदत संप पुकारला आहे. संपाचा आज नववा दिवस होता. आज कामगारांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी कामगारांनी प्रांत कार्यालयाबाहेर निदर्शने केली. त्यानंतर शिष्टमंडळाने प्रांताधिकारी शिंगटे यांची भेट घेतली. तत्कालीन कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दोन महागाई भत्ते एकत्र करून मजुरीवाढ जाहीर करण्याचा करार झाला आहे; मात्र त्याची 2017 मध्ये अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे कामगारांचे मोठे नुकसान झाले आहे.

त्यामुळे तातडीने 2017 चा फरक आणि 2018 ची मजुरीवाढ, अशी एकूण 9 पैसे मजुरीवाढीची मागणी कामगार नेत्यांनी यावेळी झालेल्या चर्चेत लावून धरली. त्यानंतर 2017 आणि 2018 प्रत्येकी 3 पैसे याप्रमाणे दोन वर्षांची 6 पैसे मजुरीवाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला असून, तो मंजुरीसाठी वरिष्ठांकडे सादर केला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर त्याची घोषणा करणार असल्याचे सहायक कामगार आयुक्त गुरव यांनी सांगितले. त्यानंतर प्रांत कार्यालयाबाहेर कामगारांची सभा झाली. त्यामध्ये मजुरीवाढ मिळेपर्यंत संप सुरूच ठेवण्याची भूमिका घेण्यात आल्यामुळे संप सुरूच राहिला आहे. मजुरीवाढ, कामगार कल्याण मंडळाच्या स्थापनेसह अन्य प्रलंबित मागण्यांप्रश्‍नी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणि जेल भरो आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी जाजू यांनी दिला. आंदोलनात दत्ता माने, परशराम आगम, मारुती आजगेकर, धोंडीबा कुंभार, मदन मुरगुडे, सुनील बारवाडे, राजेंद्र  निकम, आनंदा गुरव, शिवानंद पाटील, सदा मलाबादे, बंडोपंत सातपुते आदींसह कामगारांनी सहभाग घेतला होता.