Wed, Apr 24, 2019 15:32होमपेज › Kolhapur › इचलकरंजीला वारणा पाणी योजनेतून पाणी मिळणार : चंद्रकांत पाटील 

इचलकरंजीला वारणा पाणी योजनेतून पाणी मिळणार : चंद्रकांत पाटील 

Published On: May 31 2018 8:15PM | Last Updated: Jun 01 2018 12:52AMइचलकरंजी : प्रतिनिधी

इचलकरंजी शहराला वारणा नदीतूनच पाणीपुरवठा करण्यात यावा, त्यासाठी दानोळीऐवजी हरिपूर संगमाजवळ उद्भव निश्‍चित करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी 15 दिवसांत याबाबतचा अहवाल शासनाला सादर करावा, असा निर्णय महसूलमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे मंत्रालयात गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

ही योजना कार्यान्वित होईपर्यंत कृष्णा पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी निधी दिला जाईल आणि दानोळीकरांवर दाखल झालेले गुन्हेही मागे घेतले जातील, असाही निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला. दरम्यान, मंत्री पाटील यांच्या आवाहनानंतर वारणा कृती समिती आणि वारणा बचाव समितीकडून सुरू असलेले उपोषण आंदोलन स्थगित करण्यात आले.

वारणा योजनेप्रश्‍नी दुसरी बैठक पालकमंत्री पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात पार पडली. जलसंपदा विभागाचे सचिव बिराजदार यांनी उजव्या व डाव्या कालव्याची लांबी कमी केल्यामुळे वारणा धरणात गेल्या दहा वर्षांत दरवर्षी पाच टीएमसीपेक्षा जास्त प्रमाणात पाणी शिल्लक राहत असल्याने पिण्यासाठी पाणी देण्यास हरकत नसल्याचे मत व्यक्‍त केले. माजी मंत्री विनय कोरे यांनी, पिण्याच्या पाण्याला विरोध नसल्याचा पुनरुच्चार करून वारणा काठावरील दुष्परिणामसुद्धा विचारात घेऊन सर्वमान्य तोडगा काढण्याचे आवाहन केले. शिरोळचे आ. उल्हास पाटील यांनी, पंचगंगा नदीचे बॅक वॉटर राजापूरपासून 28 कि.मी. मागे जाते.

पाण्याची पातळी 14 फूट राहत असल्यामुळे याच पर्यायाचा विचार करावा, असे आवाहन केले. खा. राजू शेट्टी यांनी, वारणा नदीतून पाणी उपसा करू शकणार्‍या सर्व गावांना वारणेचे पाणी देण्यात यावे, अशी भूमिका मांडली. आ. सुरेश हाळवणकर म्हणाले, इचलकरंजी योजनेमुळे दानोळीत वारणा कोरडी पडेल, असे पाटबंधारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सांगितल्यास आम्ही उपसा केंद्र बदलण्यास तयार आहोत; पण पाणी वारणेचेच घेणार.

शेती, पिण्यासाठी पाणी कमी पडणार नाही : पालकमंत्री

पालकमंत्री पाटील यांनी, या योजनेमुळे शिरोळ किंवा हातकणंगले तालुक्यातील वारणा नदीकाठावरील गावांना कोणत्याही परिस्थितीत पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी कमी पडणार नाही, याची ग्वाही यावेळी दिली. तसेच वारणेतून केवळ पिण्यासाठी पाणी उपसा करावा, त्यासाठी नगरपालिकने वेगळी पाईपलाईन करावी, असा पर्याय सुचविला. मात्र, अंमलबजावणीच्या दृष्टीने ते कठीण असल्यामुळे उपसा केंद्रासाठी वारणा नदीतच परंतु आसपासच्या परिसराचा पर्याय सुचविला. त्यावर सर्वांचे एकमत झाले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पाटबंधारे विभागाचे अधिकारी या पर्यायी पाणी उपसा केंद्राचा अहवाल 15 दिवसांत देतील व मान्यतेसाठी सादर करतील. नव्या ठिकाणाहून पाणी उपसा करण्याची व समन्वय साधण्याची जबाबदारी सर्वांनी घ्यावी, असे निर्णय यावेळी घेण्यात आले.

चार पर्याय

या बैठकीत दोन्ही बाजूने इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी चार पर्याय समोर आले आहेत. त्यामध्ये सध्या आहे त्या ठिकाणाहून पाणी उपसा करण्यासाठी राजापूर बंधार्‍याची उंची वाढविण्यात यावी किंवा नृसिंहवाडीच्या आसपास उपसा केंद्र करून पाणी घ्यावे किंवा दूधगंगा उजव्या कालव्यातून पाणी घ्यावे, असे सुचवण्यात आले. परंतु, शुद्ध व मुबलक पाणी मिळण्यासाठी हे तिन्ही पर्याय वाजवी नसल्यामुळे इचलकरंजी शहराला वारणा नदीतूनच सध्या ठरवण्यात आलेल्या उपसा केंद्राच्या आसपासच जागा निश्‍चित करण्याचा पर्याय एकमताने सहमत करण्यात आला.

बैठकीस ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, पाणीपुरवठामंत्री बबन लोणीकर, आ. डॉ. सुजित मिणचेकर, महादेव धनवडे, विक्रांत पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, विनय कोरे, नगराध्यक्ष सौ. अलका स्वामी, जलसंपदा विभाग लाभक्षेत्र सचिव बिराजदार, जयसिंगपूरचे पिंगळे, मुख्याधिकारी प्रशांत रसाळ, उपजिल्हाधिकारी काटकर, पाणीपुरवठा उपसचिव कानडे, नगरविकास कार्यासन अधिकारी नीलेश पोतदार उपस्थित होते.