Mon, Apr 22, 2019 01:42होमपेज › Kolhapur › वाहतूक शाखेचा कारभारच बेशिस्त

वाहतूक शाखेचा कारभारच बेशिस्त

Published On: Dec 04 2017 1:38AM | Last Updated: Dec 03 2017 11:20PM

बुकमार्क करा

इचलकरंजी : प्रतिनिधी

शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी याकरिता शहर वाहतूक शाखेमार्फत क्रेनचा वापर वर्षांनुवर्षे सुरू आहे. मात्र, वाहतुकीला शिस्त लावण्याऐवजी केवळ बेशिस्त पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करून वाहतूक व्यवस्थेला वळण कसे लागणार, असा प्रश्‍न आहे. बेकायदेशीर इमारती, त्याठिकाणी न करण्यात आलेली पार्किंग व्यवस्था यामुळे रस्त्यावर वाहने लावण्याशिवाय कोणताही पर्याय वाहनधारकांपुढे नाही. चूक पालिका प्रशासनाची असताना भुर्दंड मात्र वाहनधारकांना सोसावा लागत आहे. त्यामुळे पालिका वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर निधी खर्च करणार की वाहतूक नियंत्रण शाखा केवळ वाहनधारकांच्या खिशावर डल्ला मारणार, याची आता उत्सुकता आहे. 

शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणात वाहनांची संख्याही प्रचंड वाढली आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील कोल्हापूर नाका, छत्रपती शाहू महाराज पुतळा, मलाबादे चौक, महात्मा गांधी पुतळा, स्टेशन रोडवरील डेक्कन स्पिनिंग मिलसमोर रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी नित्याचीच बाब बनली आहे. या रस्त्यांवर विशेषत: सकाळी 10 ते 11 आणि सायंकाळी 5 ते 7 पर्यंत वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे दररोज किरकोळ अपघात घडत असतात तर काहीवेळा मोठे अपघात होऊन वाहनधारकांना कायमचे अपंगत्व तसेच जीव गमवावा लागला आहे. 

या सर्व बाबींचा विचार करून शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी शहर वाहतूक शाखेने क्रेनचा वापर सुरू केला. ही क्रेन प्रमुख रस्त्यांवरून दिवसभर फिरत असते. क्रेनसोबत वाहतूक शाखेचा एक  व ठेकेदाराचे चार ते पाच कर्मचारी असतात. वाहन उचलल्यानंतर 200 रुपयांचा दंड भरून वाहनधारकाला वाहन ताब्यात मिळते. काहीवेळा वाहनधारकांची कोणतीही चूक नसताना त्यांचे वाहन उचलले जाते. त्यामुळे वाहनधारकाला नाहक दंड भरावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक शाखेचा कर्मचारी व वाहनधारकांच्यात वादावादी होते तर काहीवेळा एकमेकांच्या अंगावर जाण्याचे प्रकारही घडत आहेत. शहरात पार्किंग पट्टे व्यवस्थितपणे मारलेले नसल्याचे वाहनधारकांचे म्हणणेही रास्तच आहे. मात्र, शहर वाहतूक शाखेकडून काहीवेळा सक्ती करून दंड आकारला जात आहे. 

वास्तविक शहरात पार्किंग पट्टे मारण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे. वाहतूक शाखेने वेळावेळी त्याबाबत पत्रव्यवहार करून नगरपालिकेला जाग आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवेळी नगरपालिकेकडून निधी नसल्याचा राग आळवला जात आहे. नगरपालिकेच्या कुचकामी धोरणामुळे वाहनधारक आणि शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी यांच्यात जोरदार वादावादी दररोज घडत आहे. या वादावादीतून भविष्यात एखादी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगरपालिकेने शहरात पार्किंग पट्टे, झेब्रा क्रॉसिंगचे मार्किंग केल्यानंतरच वाहतूक शाखेने क्रेनचा वापर करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. वाहने लावायची तरी कुठे?

येथील बँक ऑफ महाराष्ट्रसमोरील स्टेशन रोडची रुंदी कमी आहे. याठिकाणीच टांगा, रिक्षा आणि वडाप वाहतुकीचा थांबा आहे. बँकेमध्ये येणार्‍या ग्राहकांची संख्याही प्रचंड आहे. नागरिकांकडून आपली वाहने याठिकाणी व्यवस्थित पार्किंग होत आहेत. मात्र, आपले वाहन काढण्याच्या नादात त्यांच्याकडून दुसर्‍याचे वाहन रस्त्यावर लावले जाते. त्यामुळे चूक नसताना वाहनधारकाला 200 रुपयांचा दंड सोसावा लागत आहे. पालिकेच्या बेपर्वाईने समस्या गंभीर 

शहरातील वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. एकेका कुटुंबाकडे पाच-सहा वाहने आहेत. त्याचा शहरातील अरुंद रस्त्यांवर ताण वाढत चालला आहे. दुसरीकडे अरुंद रस्त्यांवर व्यापारी संकुल उभे राहत आहेत. तिथे संकुलात पार्किंगची व्यवस्था करणे आवश्यक आहे. परंतु, पालिकेच्या अधिकार्‍यांना हाताशी धरून पार्किंगच्या जागेत दुकानगाळे उभे करण्यात येत आहेत. त्यामुळे अशा संकुलात येणार्‍या ग्राहकांना रस्त्यावर वाहने पार्क करावी लागत आहेत. परिणामी त्यांना दंडाच्या माध्यमातून आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.