Tue, Mar 26, 2019 23:56होमपेज › Kolhapur › टेक्स्पोजर मुळे वस्त्रोद्योगाच्या आधुनिकीकरणाला चालना

टेक्स्पोजर मुळे वस्त्रोद्योगाच्या आधुनिकीकरणाला चालना

Published On: Jan 15 2018 1:48AM | Last Updated: Jan 15 2018 1:32AM

बुकमार्क करा
इचलकरंजी : प्रतिनिधी

येथील कोल्हापूर रोडवरील मॉडर्न हायस्कूलजवळ भरलेल्या ‘टेक्स्पोजर 2018’ या वस्त्रोद्योग यंत्रसामग्री प्रदर्शनाला आज दै. ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांनी भेट दिली. ‘टेक्स्पोजर’सारख्या उपक्रमामुळे वस्त्रोद्योगाच्या आधुनिकीकरणाला निश्‍चित चालना मिळेल, असा आशावाद डॉ. जाधव यांनी यावेळी व्यक्त केला. 

डीकेटीई व रोटरी क्लब सेंट्रल यांच्या वतीने ‘टेक्स्पोजर 2018’ या वस्त्रोद्योगातील आधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार असलेल्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात देश-विदेशातील सुमारे 200 हून अधिक कंपन्यांचे स्टॉल  उभारण्यात आले आहेत. आधुनिक यंत्रमागाच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या बेल्जियमच्या पिकॅनॉल या कंपनीपासून किफायतशीर किमतीत आधुनिक यंत्रसामग्रींचे उत्पादन करणार्‍या चीनमधील कंपन्यांच्या स्टॉलचा या प्रदर्शनात समावेश आहे.

याशिवाय देशातील विविध कंपन्यांचे स्टॉलही या प्रदर्शनात उभारण्यात आले आहेत. याशिवाय स्थानिक उद्योजकांनीही वस्त्रोद्योगात आंतरराष्ट्रीय स्तरावर गरुडझेप घेतली असून, त्यांनीही आपल्या उत्पादनांची, सेवांची माहिती देणारे स्टॉल उभारले असून, ते या प्रदर्शनाला भेटी देणार्‍या उद्योजकांचे लक्ष वेधून घेत आहेत. दरम्यान, या प्रदर्शनाचा आज रविवारी शेवट दिवस होता. त्यामुळे प्रदर्शन पाहण्यासाठी उद्योजकांनी मोठी गर्दी केली होती. दै. ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांनीही आज प्रदर्शनस्थळी सर्व स्टॉलना भेटी दिल्या.

डॉ. जाधव यांनी वस्त्रोद्योगातील विस्मयकारक प्रगतीबद्दल कौतुक व्यक्त करून आधुनिक तंत्रज्ञानाचा सर्वसामान्य कारखानदारांनीही अवलंब करणे गरजेचे असून, त्या दिशेने ‘टेक्स्पोजर’ हा उपक्रम एक आश्‍वासक पाऊल असल्याचे गौरवोद्गार काढले. यावेळी प्रत्येक स्टॉलवर डॉ. योगेश जाधव यांचे स्टॉलधारकांच्या वतीने गुलाब पुष्प व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात येत होते. प्रदर्शनस्थळी आज खा. धनंजय महाडिक, पणनमंत्री सदाभाऊ खोत, माजी खासदार जयवंतराव आवळे आदींनीही भेट दिली. डॉ. योगेश जाधव यांच्यासह सर्व पाहुण्यांचे स्वागत उपक्रमाचे प्रोजेक्ट मॅनेजर अंबरिश सारडा, नितीन धूत यांनी केले.