Mon, Mar 25, 2019 05:36
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › इचलकरंजीला वारणेचे पाणी मिळाले पाहिजे : राजू शेट्टी 

इचलकरंजीला वारणेचे पाणी मिळाले पाहिजे : राजू शेट्टी 

Published On: May 11 2018 1:55AM | Last Updated: May 11 2018 1:16AMइचलकरंजी : प्रतिनिधी

इचलकरंजीसाठी मंजूर झालेल्या वारणा योजनेमुळे शहर विरुद्ध गाव असा  निर्माण झालेला  संघर्ष अत्यंत दुर्दैवी आहे. बळजबरीने योजनेचे काम होणार नाही. राजकारणापलीकडे जाऊन याचा विचार होणे गरजेचे असल्याचे मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्‍त केले. चांदोली धरणातून वाटप होणार्‍या पाण्याचे पुन्हा एकदा ऑडिट होण्याची  गरज आहे. वारणा योजनेप्रश्‍नी जिल्ह्यातील प्रमुख नेतेमंडळींची मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करून याप्रश्‍नी मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेऊ, अशी ग्वाहीही खा. शेट्टी यांनी दिली. इचलकरंजीला वारणेचे पाणी मिळालेच पाहिजे, असा दावा त्यांनी यावेळी केला असला तरी याप्रश्‍नी त्यांनी पद्धतशीरपणे मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात चेंडू टोलवल्याची चर्चा सुरू होती. 

‘अमृत’ योजनेतून इचलकरंजीसाठी मंजूर झालेल्या वारणा नळपाणी पुरवठा योजनेला दानोळीसह संपूर्ण वारणाकाठचा विरोध आहे. इचलकरंजीतील नागरिकांनीही जशास तसे उत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे. या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी पालिकेत खा. शेट्टी यांनी बैठक घेतली. खा. शेट्टी म्हणाले, समन्वयातून वारणाप्रश्‍नी तोडगा निघणे गरजेचे आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून चुकीची माहिती गेल्यामुळे प्राधिकरणाचे अधिकारीच याप्रश्‍नी राजकारण करीत आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वारणाकाठच्या शेतकर्‍यांना पाणी कमी पडू देणार नाही आणि शेतकर्‍यांची फसवणूक होणार नाही, असा विश्‍वास शासनाने देणे गरजेचे आहे. पावसाळ्यात सुमारे 7 ते 8 टीएमसी पाणी कर्नाटकला वाहून जाते. चांदोली धरण बांधताना विविध घटकांसाठी पाण्यावर आरक्षणही टाकले आहे. या आरक्षणाप्रमाणे पाणी उचलले जाते काय, याचे ऑडिट करणेही गरजेचे आहे. वारणेतूनच पाणी आणण्यासाठी दानोळी सोडून अन्य उद्भव धरता येईल का आणि मुबलक पाणी असताना हा वाद का उत्पन्‍न झाला आहे, याचे मूळ शोधणेही गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

नगराध्यक्षा अलका स्वामी म्हणाल्या, पंचगंगा नदी प्रदूषित झाल्यामुळे आणि कृष्णा योजना जर्जर झाल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे सध्या चार दिवसांतून पाणीपुरवठा केला जातो. गळती लागल्यास आणि वीजपुरवठा खंडित झाल्यास शहराला आठवड्यातून एकदाच पाणी मिळते. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला पालिकेला तोंड द्यावे लागते. भविष्यात ही स्थिती आणखीनच बिकट होणार आहे. त्यामुळे शहराला वारणेशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले. 

पाणीपुरवठा सभापती नितीन जांभळे यांनी प्रदूषित पाणीपुरवठ्यामुळे 2013 मध्ये काविळीने 40 जणांचा बळी गेला तर सुमारे दहा हजार नागरिक बाधित झाले होते. त्यामुळे वारणा योजना महत्त्वाची असताना ज्येष्ठ नेते एन.डी.पाटील या योजनेला का विरोध करीत आहेत, असा सवाल उपस्थित केला. पंचगंगा नदी प्रदूषणाला इचलकरंजी शहर जबाबदार असल्याचे सांगून शहराला जाणीवपूर्वक टार्गेट केले जात असल्याचे विठ्ठल चोपडे यांनी सांगितले. नदी प्रदूषणात कोल्हापूरसह नदीकाठच्या गावांचाही तितकाच हातभार आहे. त्यामुळे इचलकरंजीला दोष देणे चुकीचे आहे. 

जिल्ह्यात अनेक पाणी योजना झाल्या असताना इचलकरंजीच्या योजनेसाठी दानोळीकर टोकाची भूमिका का घेत आहेत, असा सवाल यावेळी शशांक बावचकर, सागर चाळके यांनी उपस्थित केला. या बैठकीस उपनगराध्यक्षा सरिता आवळे, नगरसेवक अशोक जांभळे, तानाजी पोवार, अजित जाधव, सुनील पाटील, राजू बोंद्रे, ध्रुवती दळवाई आदींसह नागरिक उपस्थित होते.