Mon, Apr 22, 2019 12:05होमपेज › Kolhapur › यंत्रमाग कारखानदारांच्या मजुरीवाढीचा प्रश्‍न सोडवा

यंत्रमाग कारखानदारांच्या मजुरीवाढीचा प्रश्‍न सोडवा

Published On: Dec 27 2017 1:30AM | Last Updated: Dec 26 2017 11:38PM

बुकमार्क करा

इचलकरंजी : वार्ताहर

कामगार, महागाई भत्ता व यंत्रमाग कामगार मजुरीवाढीचा निर्णय घेण्याआधी ट्रेडिंग कंपनीधारक आणि यंत्रमागधारकांची बैठक घेण्यात यावी, कोणत्याही परिस्थितीत एकतर्फी निर्णय जाहीर करू नये, अन्यथा यंत्रमाग बंद ठेवण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा जनसेवा यंत्रमागधारक संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे प्रांताधिकारी समीर शिंगटे व सहायक कामगार आयुक्त यांना देण्यात आला आहे. शहरात साध्या यंत्रमागधारकांची संख्या मोठी आहे. हा घटक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून तो ट्रेडींग कंपनीधारकांकडून मजुरीवर बिमे आणून व्यवसाय करतो. सध्या खर्चीवाल्यांना 52 पिकास 5.50 पैसे अशी अल्पशी मजुरी ट्रेडींगधारकांकडून मिळत आहे. यंत्रमाग व तत्सम घटकांचा वाढता खर्च पाहता ही मजुरी पुरेशी नाही. मजुरीवाढीसाठी सातत्याने आंदोलने सुरू आहेत.

मात्र, ट्रेडींगधारक मजुरीवाढ देत नाहीत. खर्चीवाल्यांबरोबरच स्वत:चे सट असणार्‍यांची अवस्थाही बिकट आहे. यंत्रमाग कामगारांना मजुरीवाढ देण्यास विरोध नसून आडात असेल तरच पोहर्‍यात येईल, या उक्तीप्रमाणे ट्रेडींगधारकांनी मजुरीवाढ दिल्यास कारखानदारही मजुरीवाढ देण्यास बांधील राहतील. त्यामुळे ट्रेडींगधारक व यंत्रमागधारकांची प्रथम मजुरीवाढीसंदर्भात बैठक घ्यावी व त्यानंतर निर्णय घ्यावा, असे निवेदनात नमूद केले आहे. शिष्टमंडळात धर्मराज जाधव, योगेश वाघमारे, संजय चिंदके, ऋषिकेश जाधव, प्रदीप उबारे, अरुण शेवडे आदी उपस्थित होते.

 1 जानेवारीपासून यंत्रमाग बंद आंदोलनाचा इशारा

यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढीचा तिढा न संपल्यामुळे राष्ट्रवादी कामगार संघटनेच्या वतीने मंगळवारी सहायक कामगार आयुक्त कार्यालय आणि प्रांत कार्यालयासमोर काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्यात आली. याप्रश्‍नी महिना अखेरपर्यंत तोडगा न निघाल्यास 1 जानेवारीपासून बेमुदत यंत्रमाग बंद आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. कोल्हापूर येथे 2013 मध्ये झालेल्या करारानुसार यंत्रमाग कामगारांची महागाई भत्त्यानुसार मजुरीवाढ करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी कामगार संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. 

 यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त यांच्यासमवेत संयुक्त बैठक घेऊन याप्रश्‍नी तोडगा काढू, अशी ग्वाही देण्यात आली होती. मात्र, ही बैठक न बोलावल्याने संघटनेच्या वतीने आज सहायक कामगार आयुक्त व प्रांत कार्यालयासमोर काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्यात आली. मजुरीवाढ न दिल्यास 1 जानेवारीपासून बेमुदत यंत्रमाग बंद ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.  आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष मिश्रीलाल जाजू, मदन मुरगुडे आदींसह यंत्रमाग कामगार सहभागी झाले होते.