Wed, Jul 17, 2019 16:11होमपेज › Kolhapur › मजुरीवाढ रक्‍कम फरकासह द्या

मजुरीवाढ रक्‍कम फरकासह द्या

Published On: Feb 13 2018 2:04AM | Last Updated: Feb 12 2018 11:57PMइचलकरंजी : प्रतिनिधी

सहायक कामगार आयुक्‍तांनी 2013 मध्ये झालेल्या करारानुसार 6 पैशांची मजुरी वाढ घोषित केली आहे. ही मजुरी वाढीची रक्‍कम फरकासह मिळावी यासाठी लाल बाबटा जनरल कामगार युनियनच्या नेतृत्वाखालील शिरोळ तालुक्यातील अब्दुल लाट येथील यंत्रमाग कामगारांनी सहायक कामगार आयुक्‍त कार्यालयाबाहेर निदर्शने केली.  महागाई भत्त्यानुसार यंत्रमाग कामगारांना मजुरी वाढीसाठी सर्व कामगार संघटनांनी 1 जानेवारीपासून बेमुदत आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर सहायक कामगार आयुक्‍त अनिल गुरव यांनी 6 पैशांची मजुरी वाढीची घोषणा केली. त्यानुसार यंत्रमागधारकांनी मजुरी वाढ द्यावी, असेही सूचित केले होते.

मात्र, अब्दुल लाट येथील यंत्रमागधारकांनी फरकासह मजुरीवाढ देण्यास नकारघंटा दर्शविला आहे. परिणामी तिथल्या कामगारांनी 10 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. फरकासह मजुरीवाढ मिळावी या मागणीसाठी त्यांनी आज सहायक कामगार आयुक्‍त कार्यालयासमोर निदर्शने केली. मागण्यांचे निवेदनही सहायक कामगार आयुक्‍त कार्यालयात देण्यात आले. मजुरीवाढीचा प्रश्‍न निकालात काढण्यासाठी अब्दुल लाट येथील यंत्रमागधारक आणि कामगार संघटनेची संयुक्‍त बैठक घेण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. आंदोलनात दत्ता माने, सुभाष कांबळे यांच्यासह अब्दुल लाट येथील कामगार सहभागी झाले  होते.