होमपेज › Kolhapur › वर्दीतील खंडणीखोरांची पाठराखण कशासाठी?

वर्दीतील खंडणीखोरांची पाठराखण कशासाठी?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

इचलकरंजी : प्रतिनिधी

खुनाच्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून एका यंत्रमाग कामगाराकडे खंडणी मागण्याचा ‘प्रताप’ ज्यांनी खंडणीखोरांवर कारवाई करायची त्या खाकी वर्दीतील कायद्याच्या रक्षकांनीच केला. या गंभीर प्रकाराची दखल वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घेऊन पोलिस निरीक्षकाची बदली, तर पोलिस कॉन्स्टेबल पांडुरंग जाधवरला निलंबित करण्यात आले. पण याप्रकरणी संबंधितांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याच्या कारवाईला मात्र पोलिस अधिकार्‍यांनी सोयीस्कर बगल देऊन वर्दीतील खंडणीखोरांची पाठराखण केली आहे.

सांगलीतील पोलिसांनी कोठडीतील संशयिताचा अमानूष खून केल्याने पोलिस दलाची सर्वत्र नाचक्‍की झाली. खाकी वर्दीतही किती क्रूर गुन्हेगार लपलेला असू शकतो, याचा प्रत्यय या खळबळजनक घटनेने आला. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी या प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळून खाकी वर्दीवर पडलेला डाग पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु, खाकी वर्दीतील कायद्याचे रक्षक अशा घटनांपासून कोणताही बोध घेण्यास तयार नाहीत, याचा प्रत्यय नुकताच इचलकरंजीत आला. शहापूर पोलिस ठाण्याकडील कॉन्स्टेबल पांडुरंग जाधवर याने एका यंत्रमाग कामगाराला खुनाच्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून त्याच्याकडे खंडणी मागितली.

राहुल सुरवसे खूनप्रकरणी अद्याप दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. त्यामुळे त्यात तुझे नाव येऊ शकते, अशी भीती पांडुरंग जाधवर याने दाखवली व खंडणीची मागणी केली. जाधवर याने खंडणी मागताना पोलिस निरीक्षक सीताराम डुबल यांचाही संदर्भ दिला.  खाकी वर्दीतील माणसाचे कोणी वाकडे करू शकत नाही, अशा अविर्भावात वावरणार्‍या पांडुरंग जाधवरला साध्या यंत्रमाग कामगाराने धडा शिकवला. त्याने मोबाईलवरील जाधवर याचे खंडणी मागणारे संभाषण रेकॉर्ड करून ते व्हायरल केले.

त्यामुळे खाकी वर्दीची पुन्हा नाचक्‍की झाली. ज्यांनी खंडणीखोरांवर कारवाई करायची, कायद्याचे रक्षण करायचे त्यांच्यावरच खंडणीखोर असा शिक्‍का या प्रकरणाने बसला. या प्रकरणाचीही वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेऊन पोलिस कॉन्स्टेबल पांडुरंग जाधवर याला तातडीने निलंबित केले तर पोलिस निरीक्षक सीताराम डुबल यांची मुख्यालयाकडे तडकाफडकी बदली केली; पण याप्रकरणी त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यास मात्र चालढकल करण्यात येत आहे. त्यांची खातेअंतर्गत चौकशी करण्याच्या गोंडस नावाखाली त्यांना कायदेशीर कारवाईतून सूट देण्याचा प्रकार धक्‍कादायक आहे.

एखाद्या खंडणी प्रकरणात सरकारी कर्मचारी सापडला असेल तर त्याच्यावर केवळ बदली किंवा निलंबनाची कारवाई करून प्रकरणावर पडदा टाकण्यात येत नाही. त्यांच्यावर रितसर गुन्हा दाखल करून त्यांचे धिंडवडे काढण्यात येतात. पण स्वत:च्याच पोलिस खात्यातील खंडणीखोरांवर गुन्हे दाखल करताना मात्र पोलिस अधिकार्‍यांचे हात का अखडत आहेत, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. सामान्य गुन्हेगारांना एक न्याय आणि वर्दीतील खंडणीखोरांना वेगळा, असा प्रकार या प्रकरणात अनुभवण्यास मिळत आहे. गुन्हे दाखल करण्याचे अधिकार केवळ आपल्याकडे आहेेत म्हणून त्याचा मनमानीप्रमाणे वापर करण्याचा अधिकार वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना कोण बहाल केला, असा प्रश्‍न यानिमित्ताने करण्यात येत आहे.

प्रकरणावर पडदा? 

या प्रकरणातील संभाषणाची फीत हा महत्त्वपूर्ण पुरावा आहे. त्याच्या आधारेच जिल्हा पोलिसप्रमुखांनी पोलिस कॉन्स्टेबलला निलंबित केले आहे तर पोलिस निरीक्षक सीताराम डुबल यांची बदली केली आहे; पण त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होणार की या जुजबी कारवाईनेच प्रकरणावर पडदा पडणार, याचा खुलासा मात्र जिल्हा पोलिसप्रमुखांनी केलेला नाही.