होमपेज › Kolhapur › मटका बुकींचा आता ऑनलाईन पसारा

मटका बुकींचा आता ऑनलाईन पसारा

Published On: Dec 06 2017 2:02AM | Last Updated: Dec 05 2017 11:07PM

बुकमार्क करा

इचलकरंजी : प्रतिनिधी

चिठ्ठीद्वारे मटक्याचे बेटिंग घेणार्‍या जिल्ह्यातील बुकींनी आता ऑनलाईन गेम्सकडे मार्चा वळवला आहे. मटकाबुकींनी जिल्हाभरच नव्हे तर संपूर्ण राज्यभर ऑनलाईन गेमचे जाळे विणले आहे. ‘ओनली फॉर अम्युजमेंट’ अशी ठळक ओळ टाकून त्यातून ऑनलाईन जुगार चालवला आहे. पोलिस दलात सायबर स्पेशालिस्ट आहेत. त्यांनी या गेम्सच्या सॉफ्टवेअरचा अभ्यास केल्यास गेम निव्वळ मनोरंजनासाठी नसून त्यातून दररोज कोट्यवधींची कमाई बुकी करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येणार आहे. 

इचलकरंजी व कोल्हापूर ही जिल्ह्यातील दोन मोठी शहरे आहेत. त्याचबरोबर या दोन शहरात मटका बुकींची संख्याही मोठी आहे. त्यांचा अवैध धंद्याच्या क्षेत्रात मोठा दबदबा आहे. इचलकरंजीतील मटकाबुकी तर लोडिंग घेण्यात माहीर आहेत. त्यात त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही. या बुकींनी सांगली, सातारा, कोल्हापूर व सीमाभागात हातपाय पसरले आहेत. मटका व्यवसायातून मालामाल झालेल्या इचलकरंजी व कोल्हापुरातील बुकींनी या पैशातून खासगी सावकारी जोरात चालवली आहे. अडलेल्या-नडलेल्यांच्या जमिनी कमी मोबदल्यात लाटण्याचा उद्योगही या बुकींनी चालवला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात नव्याने नियुक्त होवून येणार्‍या पोलिस अधिकार्‍यांनी अवैध धंद्यांचा बीमोड करण्याची वल्गना वेळोवळी केली; पण मटका व्यवसायातील बड्या धेंडापर्यंत पोलिसांचे हात कधीच पोहोचले नाहीत. पंटरवर कारवाई करून जिल्ह्यातील पोलिसांनी आजपर्यंत केवळ कारवाईचा निव्वळ फार्सच केला. संजयकुमार सारख्या काही पोलिस अधिकार्‍यांनी अवैध धंद्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला; पण चांगले अधिकारी बदली होऊन गेले की पुन्हा अवैध धंद्यांनी डोक वर काढल्याचा अनुभव जिल्ह्याने वेळोवेळी घेतला आहे. आता तर जिल्ह्यातील मटका व्यावसायिकांनी काळानुरूप पावले टाकत आधुनिकतेची कास धरली आहे. 

देशात केवळ गोवा राज्यात कॅसिनोला मान्यता आहे, पण सध्या संगणकाचे युग असल्याने हा कॅसिनो ऑनलाईन रूपात जगभर पोहोचला आहे. महाराष्ट्रात कॅसिनोला बंदी असली तरी या मटकाबुकींनी कॅसिनोचे सॉफ्टवेअर तयार करून कॅसिनो खेळात चांगलेच पाय रोवले आहेत. ऑनलाईन कॅसिनो चालवणार्‍या कंपन्यांची एजन्सी कोल्हापूर व  इचलकरंजी येथील मटका बुकींनी घेतली आहे. त्यांनी लॉटरी सेंटरच्या ठिकाणी हा गेम उपलब्ध करून दिला आहे. इचलकरंजीत वर्दळीच्या ठिकाणी भरचौकात, कोल्हापूर बसस्थानकासमोर, हातकणंगले चौकात, शिरोळ, कुरुंदवाड अशा निमशहरात  हा ऑनलाईन कॅसिनो राजरोसपणे सुरू आहे. 

विशेष म्हणजे पोलिस अधिकार्‍यांच्या परवानगीने काही भागातच हा लुटालुटीचा उद्योग सुरू आहे. काही भागात विरोध झाल्याने काही क्षेत्रातील अधिकार्‍यांनी या उद्योगाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे इचलकरंजीच्या शिवाजीनगर भागात ही ऑनलाईन लूट सुरू आहे तर इतर ठिकाणी मोबाईलवर खेळण्यात येत आहे. ऑनलाईन कॅसिनो व्यवसायात  सॉफ्टवेअरची करामत मटका बुकींना मालामाल करीत आहे. ज्या नंबरवर बेटिंग जास्त असते तो अंक डावलून ज्या नंबरवर कमी बेटिंग आहे तो अंक काढण्याची यंत्रणा गेममध्ये कार्यान्वित केलेली असते. त्यामुळे प्रत्येक एक मिनिटाच्या खेळात मटका बुकीमालक मालामाल होतो तर जुगारी कंगाल होतो. या व्यवसायात कोणा कोणा बुकीचे हात गुंतले आहेत, याची खडान्खडा माहिती पोलिसांना आहे; पण चिरीमिरीच्या लालसेतून या लुटीकडे पोलिस कानाडोळा करीत आहेत.