Sat, May 30, 2020 12:18होमपेज › Kolhapur › ऑनलाईन कॅसिनोची पाळे-मुळे खणण्याची गरज

ऑनलाईन कॅसिनोची पाळे-मुळे खणण्याची गरज

Published On: Dec 07 2017 2:10AM | Last Updated: Dec 07 2017 1:03AM

बुकमार्क करा

इचलकरंजी : प्रतिनिधी

ऑनलाईन कॅसिनोमधून होत असलेल्या लुटीवर बुधवारी दैनिक ‘पुढारी’ने प्रकाश टाकल्यानंतर लॉटरी सेंटरच्या आडून राजरोसपणे सुरू असलेला ऑनलाईन कॅसिनो बुधवारी ऑफलाईन झाला. ज्या प्रमुख सेंटरवर ऑनलाईन कॅसिनो सुरू होता, तो तातडीने बंद करण्यात आला. जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यात इचलकरंजी व कोल्हापुरातील एजंटकडून त्याचे नियंत्रण होत असल्याने त्यांच्या इशार्‍याने तो बंद ठेवण्यात आला.

देशात केवळ गोव्यात मान्यता असलेल्या रुलेट (चक्री) चे सॉफ्टवेअर तयार करून त्याद्वारे जुगार चालवला जात आहे. गोव्यात रुलेट जुगारींच्या समोर फिरवून नंबर काढण्यात येतो. ऑनलाईन रुलेट प्रकारात मात्र कोणता नंबर काढायचा हे ठरवण्याचा अधिकार सॉफ्टवेअरच्या मालकाकडे असतो. तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या नंबरवर बेटिंग जास्त आहे, तो नंबर वगळून कमी बेटिंग असलेला नंबर काढून जुगारींची लूट सुरू असल्याचे वृत्त आज दैनिक ‘पुढारी’त प्रसिद्ध झाले.

ऑनलाईन रुलेट खेळात अर्धा ते एक मिनिटाच्या अंतराने निकाल काढला जातो. हा गेम देशभर चालवला जातो. त्यामुळे एका मिनिटाला त्यावर कोट्यवधी रुपयांचे बेटिंग लावले जाते. त्यामुळे एका मिनिटाची बुकीमालकांची कमाई कोट्यवधी रुपयांची आहे. या खेळाचे नियंत्रण कुठून होते, याचा वेबसाईटवरून अंदाज येत नाही. इचलकरंजी व कोल्हापूर येथे या गेमचे एजंट आहेत. त्यांच्या माहितीनुसार मुंबई व गुजरात येथून या खेळाचे नियंत्रण होत असल्याची माहिती ते खासगीत देतात; पण त्याचे नेमके नियंत्रण कोठून होते हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. काहींच्या मते इचलकरंजीतीलच एकाने या गेमचे मालक होण्याची ‘मनीषा’ बाळगली. त्यानेच या खेळाचे सॉफ्टवेअर तयार करून त्याची मुळे जिल्ह्यात व महाराष्ट्रभर पसरवल्याची चर्चा आहे. कोल्हापुरातील एका लोकप्रतिनिधीकडेच या गेमची मालकी असल्याची चर्चा आहे. 

इचलकरंजी व कोल्हापूर येथील गेमच्या एजंटांनी जिथे जिथे ऑनलाईन लॉटरी सेंटर सुरू आहे, तिथे त्याची एजन्सी दिली आहे. ज्या त्या क्षेत्रातील पोलिस अधिकार्‍याची तजवीज करून त्याला मान्यता घेण्यात येत आहे. मध्यंतरी या गेमविरोधात काहींनी आवाज उठवला; पण नंतर त्यांचीही तोंडे गप्प करण्यात आली. त्यामुळे या गेमच्या माध्यमातून आज राजरोसपणे लुटालूट सुरू आहे. 
या गेमविरोधात आवाज उठवल्यानंतर काही दिवस हा खेळ बंद ठेवला जातो. त्यानंतर काही दिवसांतच तो पुन्हा सुरू होतो. कोल्हापूर पोलिसांनी या गेमचे नियंत्रण कोठून होते, त्याचा मालक कोण याचा शोध घेऊन गोरगरिबांच्या संसाराला लागलेल्या  या ऑनलाईन कॅसिनो जुगाराची विषवल्ली उखडून टाकण्याची गरज आहे.