होमपेज › Kolhapur › इचलकरंजी पालिका कर्मचार्‍याची कार्यालयातच आत्महत्या

इचलकरंजी पालिका कर्मचार्‍याची कार्यालयातच आत्महत्या

Published On: Feb 02 2018 1:32AM | Last Updated: Feb 02 2018 1:21AMइचलकरंजी : वार्ताहर

इचलकरंजी नगरपालिकेतील कर्मचारी बालेचाँद हसन समडोळे (वय 42, रा. नगरपालिका क्वार्टर्स, खंजिरे मळा) यांनी पालिकेच्या  लेखापरीक्षण विभागातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्‍कादायक प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. 

समडोळे यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे.

इचलकरंजी नगरपालिकेच्या शिक्षण मंडळ विभागाकडे 1998 पासून ते शिपाई म्हणून कार्यरत होते. काही वर्षांपासून नगरपालिकेतील लेखापरीक्षण विभागात ते काम करीत होते. बुधवारी सकाळीच ते घरातून बाहेर पडले होते. नगरपालिकेच्या पार्किंगमध्ये त्यांची मोपेडही दिसून येत होती. मात्र, ते नगरपालिकेतील कार्यालयात आढळून आले नाहीत. त्यामुळे नातेवाइकांसह पालिका कर्मचार्‍यांनी त्यांचा शोध सुरू केला. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नाही. गुरुवारी सकाळी लेखापाल विभागातील एक कर्मचारी रेकॉर्ड विभागात गेला असता त्याठिकाणी समडोळे यांनी नायलॉनच्या दोरीने स्लॅबच्या हुकाला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्याने तातडीने याबाबतीच माहिती अन्य कर्मचारी व अधिकार्‍यांना दिल्यानंतर त्यांनी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे, गावभागचे निरीक्षक मनोहर रानमाळे, सहायक पोलिस निरीक्षक अरुण पवार, प्रज्ञा चव्हाण आदी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. समडोळे यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.

समडोळे याने नगरपरिषदेच्या इमारतीतच आत्महत्या केल्याचे वृत्त समजताच नगरसेवक, पदाधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. समडोळे गेल्या काही दिवसांपासून नैराश्याच्या गर्तेत होते. उसनवारीने तसेच काही संस्थांकडून त्यांनी कर्जाऊ रक्‍कम घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून पैशासाठी काहींनी त्यांच्याकडे तगादा लावल्याचे नातेवाइकांनी सांगितले. आर्थिक विवंचनेतूनच समडोळे यांनी आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. दुपारी समडोळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  बालेचाँद यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे कर्मचार्‍यांना मोठा धक्‍का बसला. पालिकेच्या इमारतीवरून सोशल मीडियावर मात्र जोरदार चर्चा सुरू होती. 

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार 

वसुलीसाठी तगादा लावून समडोळे यांना त्रास देणार्‍यांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा समडोळे यांच्या नातेवाइकांनी आयजीएम रुग्णालयात घेतला होता. नातेवाइकांनी पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे यांची भेट घेतली. यावेळी नरळे यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.