Tue, Apr 23, 2019 22:11होमपेज › Kolhapur › राजकीय भूकंपाचा अंदाज ठरणार फोल?

राजकीय भूकंपाचा अंदाज ठरणार फोल?

Published On: Dec 18 2017 2:34AM | Last Updated: Dec 17 2017 11:13PM

बुकमार्क करा

इचलकरंजी : प्रतिनिधी 

इचलकरंजी पालिकेतील सत्तेची मोट मजबूत करण्यासाठी भाजपने शाहू आघाडीला सत्ता सहभागाचे आवतण दिले आहे. परंतु, सत्तेतील सहभागाचा हा निव्वळ बुडबुडा ठरण्याची शक्यता आहे. आगामी राजकारण पाहता राष्ट्रवादीच्या जिल्हा नेतृत्वाकडून शाहू आघाडीला सत्तेत सहभागी होण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळण्याची सूतराम शक्यता नाही. त्यामुळे इचलकरंजी पालिकेत राजकीय भूकंपाचे वर्तवण्यात येणारे अंदाज फोल ठरण्याची चिन्हे आहेत. 

इचलकरंजी नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवलेल्या जांभळे गटाने भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सध्या नगरपालिकेत भाजप-राष्ट्रवादी व ताराराणी आघाडी यांची सत्ता आहे, तर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व मदन कारंडे यांची शाहू आघाडी विरोधी गटाची भूमिका बजावत  आहे. 

सध्या सत्तेतील एक वर्षाचा कार्यकाल संपत आला आहे. त्यामुळे नवीन विविध विषय समित्यांच्या सभापती निवडीच्या राजकारणाला वेग आला आहे. सध्या पाणीपुरवठा व बांधकाम या दोन महत्त्वाच्या समित्या जांभळे गटाकडे आहेत, तर उपनगराध्यक्षपद ताराराणी आघाडीकडे आहे. 

इचलकरंजी नगरपालिकेत सत्तेचा गड मबजूत व्हावा, यासाठी भाजपने विरोधातील शाहू आघाडीला सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे इचलकरंजी नगरपालिकेत राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शाहू आघाडी पालिकेतील सत्तेत सहभागी झाल्यास पुन्हा सर्व विरोधकांची काँग्रेसविरोधात एकजूट होणार आहे. त्याचे दूरगामी राजकीय परिणाम होणार असल्याने पालिकेतील या हालचालींना महत्त्व प्राप्त झाले आहे.