Fri, Apr 26, 2019 02:09होमपेज › Kolhapur › तीन पैशांची वाढ म्हणजे थट्टा

तीन पैशांची वाढ म्हणजे थट्टा

Published On: Dec 31 2017 1:51AM | Last Updated: Dec 30 2017 9:13PM

बुकमार्क करा
इचलकरंजी: प्रतिनिधी

यंत्रमाग कामगारांच्या मजुरीत तीन पैशांची वाढ देऊन सहायक कामगार आयुक्‍त अनिल गुरव यांनी कामगारांची थट्टा केली आहे. हा निर्णय मालकधार्जिन असल्याची टीका कामगार संघटना संयुक्‍त कृती समितीच्या वतीने करण्यात आली. सहायक कामगार आयुक्‍तांनी 3 पैसे मुजरीवाढीच्या पत्रकाची होळी करण्यात आली. यंत्रमाग कामगारांना 9 पैशांची वाढ न मिळाल्यास नवीन वर्षात हजारो कामगार रस्त्यावर उतरतील, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला. 

महागाई भत्त्यानुसार यंत्रमाग कामगारांच्या मजुरीत वाढ व्हावी, यासाठी कृती समितीच्या वतीने सहायक कामगार आयुक्‍त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे.  महागाई निर्देशांकानुसार मजुरीवाढ जाहीर करण्याचे अधिकार सहायक कामगार आयुक्‍तांना देण्यात आले होते; मात्र 2017 च्या महागाई भत्त्यानुसारची मजुरीवाढ त्यांनी जाहीर केलीच नाही. त्यामुळे 6 पैशांची मजुरीवाढ व 2018 मधील 3 पैशांची वाढ अशी एकूण 9 पैशांची वाढ अपेक्षित होती; मात्र त्यांनी केवळ 3 पैशांची वाढ घोषित केली आहे. ती एकतर्फी असून, ती संघटनेला अमान्य असल्याचे स्पष्ट केले. यावेळी दत्ता माने, भरमा कांबळे, शिवगोंडा खोत, शामराव कुलकर्णी, बंडा सातपुते आदींसह कामगार मोठ्या संख्येने सहभागी 
झाले होते.