Sat, Jul 20, 2019 08:55होमपेज › Kolhapur › डॉ. पाटील इस्पितळात दोन वर्षांत 500 हून अधिक प्रसूती

डॉ. पाटील इस्पितळात दोन वर्षांत 500 हून अधिक प्रसूती

Published On: Feb 13 2018 2:03AM | Last Updated: Feb 13 2018 1:23AMइचलकरंजी : प्रतिनिधी

कुमारी मातेच्या नवजात बालक विक्रीप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सोमवारी डॉ. पाटील याच्या इस्पितळात 2016 ते 2017 दरम्यान झालेल्या प्रसूती सुमारे 500 हून अधिक नोंदी तपासल्या. त्यामध्ये मोफत उपचार आणि कमी खर्चात करण्यात आलेल्या संशयास्पद प्रसूतींबाबत माहिती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. 

दिल्ली येथील केंद्रीय पथकाने डॉ. अरुण पाटील हा नवजात बालक विक्री करत असल्याची तक्रार शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडे दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी डॉ. अरुण पाटील, उज्ज्वला पाटील, अनिल चहांदे, प्रेरणा चहांदे यांना अटक केली आहे. त्यांना मंगळवार 13 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकारणातील डॉ. अमोल सवाई यांनी केलेल्या दत्तकपत्राबाबत वकिलांकडे देण्यात आली असून त्यांचा अभिप्राय मागवण्यात आला आहे. वकिलांचा अभिप्राय आल्यानंतर डॉ. सवाई दाम्पत्यांच्या कारवाईबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. 

डॉ. पाटील याच्या इस्पितळातून पोलिसांनी प्रसूती रजिस्टर व नगरपालिकेकडे नोंदवण्यात येणारी जन्मपुस्तकांच्या नोंदी जप्‍त केल्या होत्या. त्यानुसार 2016 व 2017 मध्ये झालेल्या जन्म नोंदीची चौकशी करण्यात येत आहे. तपासादरम्यान डॉ.पाटील याने काही रुग्णांची मोफत तर काही कमी पैशांमध्ये प्रसूती केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे यातील संशयास्पद प्रसूतींबाबत पोलिस तपास करीत आहेत. आज काहीजणांकडे चौकशी करण्यात आली आहे. डॉ.पाटील याने शहरातील सोनोग्राफी सेंटरमध्ये पाठवण्यात आलेल्या गर्भवतींची यादी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

त्यामध्ये 5 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीनंतर झालेल्या गर्भवतींच्या तपासणीच्या नोंदी वेगळ्या करण्याचे काम सुरू आहे. संबंधित महिलांकडेही चौकशी करण्यात येणार असल्याचे निरीक्षक सतीश पवार यांनी सांगितले.  गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची तीव्रता मोठी वाटत होती. त्यामुळे या प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकार्‍यांकडे दिला जाईल, अशी शक्यता होती. मात्र, हा तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रज्ञा चव्हाण यांच्याकडे देण्यात आला होता. पोलिस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास योग्यरीत्या सुरू होता. मात्र, अचानक या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे यांच्याकडे देण्यात आला. 


सोशल मीडियावर प्रसिद्धीचा सोस अंगलट?

समाज सेवेच्या भावनेतून आपण काहीतरी चांगले काम करीत आहोत अशी भाबडी समजूत डॉ. अरुण पाटील याची झाली होती. त्यामुळेच त्याने आपण केलेल्या कामाची सोशल मीडियाद्वारे डॉक्टरांच्या ग्रुपवर माहिती टाकण्यास सुरू केली होती.  नवजात बालक दत्तक देत असल्याचा फोटो त्याने एका डॉक्टर ग्रुपवर शेअर केला होता. हा फोटो व्हायरल होत ‘कारा’ समितीच्या हाती लागल्यामुळेच डॉ. पाटील याला पोलिस कोठडीची हवा खाण्याची वेळ आल्याची चर्चा पोलिस वर्तुळात सुरू होती.