Wed, Mar 20, 2019 12:44होमपेज › Kolhapur › गुड न्यूज... इचलकरंजीकरांना करवाढ नाही

गुड न्यूज... इचलकरंजीकरांना करवाढ नाही

Published On: Feb 27 2018 2:04AM | Last Updated: Feb 27 2018 12:54AMइचलकरंजी : वार्ताहर

शहरवासीयांवर कोणत्याही प्रकारची करवाढ न लादता इचलकरंजी नगरपालिकेच्या 2018-19 सालासाठीच्या 25 कोटी रुपयांच्या शिलकीच्या 452 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला सोमवारी एकमताने मंजुरी देण्यात आली. नगराध्यक्षांच्या नियंत्रणाशिवाय प्रशासनाकडून प्रथमच अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्याने या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. वस्तुनिष्ठ अर्थसंकल्प असल्याचे मत सत्तारूढ गटासह विरोधकांनी व्यक्‍त केले असून, आवश्यक ते बदल व तरतुदी करून अर्थसंकल्प जिल्हाधिकार्‍यांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. पालिकेकडील अखर्चित 1.24 कोटींचा निधी शासनाला परत देण्याचा निर्णयही या सभेत घेण्यात आला. 

2017-18 चे दुरुस्त व 2018-19 च्या वार्षिक अंदाजपत्रकाच्या मंजुरीसह अन्य 13 विषयांवर चर्चा करून आज पालिका सभेत निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी होत्या. पालिका प्रशासनाकडून नगराध्यक्षांच्या नियंत्रणाशिवाय प्रथमच मांडलेल्या या 452 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला यावेळी मंजुरी देण्यात आली. अर्थसंकल्पावर बोलताना राजर्षी शाहू विकास आघाडीचे विठ्ठल चोपडे यांनी, आस्थापना खर्च 57.80 टक्क्यांवर आणून तो कमी केल्याचा दावा पालिकेकडून केला गेला असला, तरी त्यामध्ये पाणीपट्टीची तूट, शिक्षण मंडळ खर्चाचा हिस्सा आदींसाठी भरीव तरतूद करणे आवश्यक होते. या तरतुदी केल्यास आस्थापना खर्चात वाढ होऊन तो 69.68 टक्क्यांवर येणार आहे. त्याचा परिणाम विकासकामांवर होण्याची शक्यता आहे. 

452 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकात शहरातील विकास आराखड्यासाठी कोणतीही भरीव तरतूद करण्यात आली नाही. वार्षिक अंदाजपत्रकात जमेच्या बाजूला विविध उत्पन्‍नाच्या मार्गे महसुलात 148 कोटी 32 लाख 36 हजार 500, वारणा योजना, घनकचरा व्यवस्थापन आदींसह सर्व अनुदाने व अंशदाने यासाठी 70 कोटी 22 लाख 16 हजार, प्राप्‍त ठेवी 12 कोटी 45 लाख 30 हजार, पालिकेकडे जमा असलेले इतर दायित्व 6 कोटी 46 लाख 10 हजार, प्रारंभीची शिल्‍लक 88 कोटी 50 लाख 54 हजार असे 325 कोटी 96 लाख 56 हजार 787 रुपये दाखवण्यात आले आहेत. यामध्ये नगरोत्थान योजनेतून रस्त्यासाठी विशेष निधी 100 कोटी व घनकचरा व्यवस्थापनअंतर्गत कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी 27 कोटी 40 लाख यांचाही समावेश असल्यामुळे अंदाजपत्रकाची रक्‍कम 452 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.