Fri, Apr 19, 2019 12:47होमपेज › Kolhapur › ‘स्वाभिमानी’च्या कार्यालयावर इचलकरंजीत फेकल्या बांगड्या

‘स्वाभिमानी’च्या कार्यालयावर इचलकरंजीत फेकल्या बांगड्या

Published On: Feb 25 2018 1:15AM | Last Updated: Feb 25 2018 12:25AMइचलकरंजी : प्रतिनिधी

रयत संघटनेचे संस्थापक कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर माढा दौर्‍यावेळी हल्ला करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ इचलकरंजीत रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगली रोडवरील खासदार राजू शेट्टी यांच्या कार्यालयावर बांगड्या फेकल्या. हल्लाच्या निषेधाच्या घोषणा देणार्‍या कार्यकर्त्यांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिस आणि आंदोलकांत झटापट झाली. पोलिसांनी दहा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 

राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मोटारीवर माढा तालुक्यातील रिधोरे बसस्थानकासमोर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. काही कार्यकर्त्यांनी गाडीवर गाजर, मका, तूर फेकली. या घटनेचे पडसाद शनिवारी इचलकरंजीत उमटले. मंत्री खोत यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला. हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटील यांनी पत्रकाद्वारे  केली. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास रयत क्रांती संघटनेचे शहराध्यक्ष विनायक कलढोणेंसह काही कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी पक्षाच्या कार्यालयाजवळ घोषणाबाजी केली.

या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ त्यांनी कार्यालयावर बांगड्या फेकल्या. अचानक झालेल्या आंदोलनामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला. गावभाग पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी विनायक कलढोणे, आकाश राणे, संतोष कांदेकर, बलजित हारगुले, राहुल कावडे, पांडुरंग पाटील, राकेश कागले, संदीप भातमारे, सचिन गोसावी, सम्राट मुळीक, अभिलाष पगडे यांना ताब्यात घेऊन सोडून  दिले.