होमपेज › Kolhapur › अभ्यास न झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

अभ्यास न झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

Published On: Feb 28 2018 1:49AM | Last Updated: Feb 28 2018 1:47AMइचलकरंजी : प्रतिनिधी

कबनूर, फुलेनगर येथील रोहित अमर माने (वय 16) या शाळकरी मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसले, तरी दहावी परीक्षेचा अभ्यास न झाल्याच्या नैराश्यातून रोहितने आत्महत्या केली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रोहित हा तिळवणी येथील एका शाळेत दहावीचे शिक्षण घेत होता. मंगळवारी दुपारीपर्यंत तो घरी मित्रांसमवेत टिव्ही बघत होता. दुपारनंतर त्याचे मित्र घरी  गेले. रोहितच्या घरातील सर्वजण कामासाठी सकाळपासूनच बाहेर गेले होते. त्यामुळे रोहित घरी एकटाच होता. दरम्यानच्या मुदतीत त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी साडेचारच्या सुमारास रोहितने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

नातेवाईक आणि मित्रांनी त्याला इंदिरा गांधी इस्पितळात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तो मयत असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान रोहित याचे वडील बजरंग दलाचे सक्रीय पदाधिकारी अमर माने यांचे चार महिन्यांपूर्वीच अपघाती निधन झाले आहे. त्यांच्या मृत्यूमुळे माने कुटूंबियाला मोठा धक्‍का बसला होता. त्यातून ते सावरण्यापूर्वीच रोहितने आत्महत्या केल्याने कुटूंबियांवर मोठा आघात झाला आहे.