Fri, Jul 19, 2019 01:16होमपेज › Kolhapur › विषय समित्यांवरून सत्तारूढांमधील मतभेद कायम

विषय समित्यांवरून सत्तारूढांमधील मतभेद कायम

Published On: Jan 05 2018 1:14AM | Last Updated: Jan 04 2018 8:42PM

बुकमार्क करा
इचलकरंजी : वार्ताहर

इचलकरंजी नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या निवडी शुक्रवारी (दि. 5) होणार आहेत. या निवडीच्या पार्श्‍वभूमीवर पालिकेतील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. महत्त्वाच्या पाणीपुरवठा, आरोग्य व बांधकाम या समित्यांच्या पद वाटपाचे चर्चेचे गुर्‍हाळ अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे इच्छुकांची चांगलीच घालमेल सुरू आहे. पद वाटपावरून फॉर्म्युला ठरवताना नेत्यांचीही कसरत होत आहे. त्यामुळे शुक्रवारी होणार्‍या निवडीमध्ये कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

इचलकरंजी नगरपालिकेत भाजप-ताराराणी-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. पाणीपुरवठा, आरोग्य व बांधकाम या महत्त्वाच्या समित्यांवरून पालिकेत सध्या राजकीय घमासान सुरू आहे. निवडीच्या अनुषंगाने वर्षभराचा कालावधी पूर्ण झाल्याने उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी यापूर्वीच राजीनामा दिला आहे. त्यामुळे उपनगराध्यक्षपदही रिक्‍त आहे. राष्ट्रवादीकडे सध्या पाणी पुरवठापद असून उपनगराध्यक्षपद ताराराणी आघाडीकडे, महिला व बालकल्याण,  शिक्षण व आरोग्य समिती भाजपकडे आहे. पाणीपुरवठा समितीवर राष्ट्रवादीकडून पुन्हा हक्‍क सांगण्यात येत आहे, तर भाजपकडूनही पुन्हा आरोग्य समितीसाठी मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. 

सत्ता स्थापन करताना ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार यंदा उपनगराध्यक्ष पदासह आरोग्य व पाणीपुरवठा या दोन समित्या ताराराणी आघाडीच्या गोटात आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या समित्यांच्या निवडीवरून चांगलेच अंतर्गत मतभेद निर्माण झाले आहेत. त्यातच काँग्रेसकडून भाजपला बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. विरोधी शाहू आघाडीनेही निवडीच्या अनुषंगाने सावध भूमिका घेतली आहे. पदे वाटपावरून सत्तारूढ आघाडीत अद्याप चर्चेचे गुर्‍हाळ सुरूच असल्याने इच्छुकांची मात्र चांगलीच घालमेल वाढली आहे. अद्याप समित्यांचा फॉर्म्युला ठरला नसल्याने त्यांच्यात चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीची किनारही सभापती निवडीला असणार आहे. त्यामुळे आघाड्यांची मनधरणी करीत सत्तेचा फॉर्म्युला ठरवताना नेत्यांचीही चांगलीच कसरत होणार आहे. उपनगराध्यक्ष निवडीबरोबर समित्या वाटपांचा फॉर्म्युला यंदा बदलला जाणार असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे उपनगराध्यक्ष निवडीकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला, तरी अद्यापही नव्या निवडीचा घोळ कायम आहे. नव्या निवडीसाठी नगराध्यक्षा सौ. स्वामी यांनी सभा अद्याप बोलावलेली नाही. त्यामुळे समित्यांच्या निवडी झाल्यानंतरच पुढील आठवड्यात उनगराध्यक्षपदाची निवड होण्याची शक्यता आहे. आमदार सुरेश हाळवणकर यांच्याकडून शिक्‍कामोर्तब झाल्यानंतरच पालिकेतील सत्तासूत्रांचे गणित स्पष्ट होणार आहे. सध्या ते परगावी असल्याने अद्याप विषय समित्यांच्या निवडीसह उपनगराध्यक्षपदाच्या निवडीचा घोळ कायम आहे. उद्या सकाळी लवकर सत्तारूढ आघाडीची बैठक होऊन त्यातच निर्णय होण्याची शक्यता आहे.