Wed, Jul 17, 2019 18:03होमपेज › Kolhapur › इचलकरंजीच्या चंदू लोहार टोळीला ‘मोका’

इचलकरंजीच्या चंदू लोहार टोळीला ‘मोका’

Published On: Jul 10 2018 1:02AM | Last Updated: Jul 09 2018 11:16PMइचलकरंजी : वार्ताहर

इचलकरंजी शहर व परिसरात दहशत माजवणार्‍या, तसेच खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, बेकायदेशीर हत्यारे बाळगणे आदीसह विविध गुन्हे दाखल असलेल्या गुंड चंद्रकांत ऊर्फ नाना गणपती लोहार (रा. जुना चंदूर रोड) याच्यासह त्याच्या टोळीतील सहा जणांविरोधात संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ‘मोकां’तर्गत कारवाई करण्यात आली आहे. याबाबतची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

मल्‍लिनाथ विजय पालापुरे (वय 24, रा. गुरुकन्‍नननगर), गुंड्या ऊर्फ सुनील चंद्रशेखर गोवनकोप (37, रा. सिद्धिविनायक कॉलनी, जुना चंदूर रोड), असिफ बशीर मुजावर (23, रा. पाटीलमळा, जुना चंदूर रोड), विशाल तुकाराम लांडगे (24, रा. सिद्धिविनायकनगर, जुना चंदूर रोड), शीतल मारुती सोलगे (31, रा. जुना चंदूर रोड) आणि याकूब सिकंदर मलीक (32, रा. जुना चंदूर रोड) अशी लोहार याच्या इतर सहा साथीदारांची नावे आहेत. दरम्यान, या टोळीचा म्होरक्या लोहार अद्याप फरार असून, इतर सहा जण पोलिस कोठडीत आहेत. 

इचलकरंजीसह परिसरात गेल्या काही वर्षांपासून गुंड चंद्रकांत लोहार ऊर्फ नाना सरकार याची प्रचंड दहशत आहे. दोन खुनाच्या प्रकरणांसह विविध गुन्ह्यांमधील त्याचे कारनामे दिवसेंदिवस वाढतच चालले होते. लोहार याच्याविरोधात 2000 सालापासून आजअखेर अनेक गुन्हे विविध पोलिस ठाण्यांत नोंद आहेत. या टोळीच्या कारवाया दिवसेंदिवस वाढतच चालल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला.