Sun, Mar 24, 2019 04:10होमपेज › Kolhapur › ...तर त्यांच्या भाळी पुन्हा अनाथाचेच जीणे!

...तर त्यांच्या भाळी पुन्हा अनाथाचेच जीणे!

Published On: Feb 12 2018 1:53AM | Last Updated: Feb 11 2018 11:27PMइचलकरंजी : प्रतिनिधी

कोणताही दोष नसताना त्यांचा जन्म अनाथ म्हणून झाला..अशा जीवांची गर्भातच कळी खुडली गेली नाही, हेही नसे थोडके..अशा अभागी जीवांच्या नशिबी एकतर कचराकुंडी येते नाहीतर अनाथालय..अशाच अनाथ म्हणून जन्मलेल्या अर्भकांना मायेची ऊब मिळाली; पण त्यासाठी ज्या मार्गाचा वापर अवलंबण्यात आला तो गैर असल्याने पुन्हा या चिमुकल्यांवर अनाथ होण्याची, हक्काच्या मातृप्रेमाला मुकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे इचलकरंजीतील अर्भक प्रकरणात मानवतावादी भूमिका घेण्याची आणि चुकांची दुरुस्ती करून त्यांच्यावर पुन्हा अनाथ होण्याची वेळ येणार नाही याची दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

या प्रकरणातील संशयित डॉक्टर अरुण पाटील याने सामाजिक जाणीवेतून विधवा, कुमारी माता यांना अपत्याला जन्म देण्यासाठी मदत केली; पण त्यामागे आर्थिक स्वार्थ असल्याने हे प्रकरण अंगलट येऊन अनेक निष्पाप भरडले जात आहेत. अनैतिक संबंधातून गर्भधारणा झाल्यास अशा कळ्या एकतर गर्भातच खुडल्या जातात किंवा  त्यांच्यावर कचराकुंडीत सडण्याची, अनाथालयात मातृप्रेमाला मुकत जगण्याची वेळ येते. 

एकीकडे अनेक यातायात करूनही अनेक दांपत्यांना अपत्य होत नाही, असे नेमके उलट चित्र समाजात आहे. त्यांच्या घरात पाळणा काही केल्या हालत नाही. त्यामुळे अशा दांपत्यांना नाईलाजास्तव मुलगा किंवा मुलगी दत्तक घेण्याची वेळ येते. परंतु, दत्तक प्रक्रिया किचकट असते. तसेच काही दांपत्यांना दत्तक प्रक्रिया पूर्ण करून बाळ नको असते. मुलगा, मुलगी दत्तक घेतलेला आहे, अशी चर्चा त्यांना नको असते. ही चर्चाही त्यांना आयुष्यभर यातना देणारी ठरू शकते. म्हणून काही दांपत्यांचा गुपचूपपणे बाळ मिळवण्याकडे कल असतो. समाजातही त्यांना नैसर्गिकरीत्या बाळ झाले आहे, हे दाखवायचे असते. 

अशा दांपत्यांना बाळ मिळवून देण्याचा आनंद देणे गैर नसले तरी अरुण पाटील याने त्याचा बाजार मांडल्याने त्याची झळ या प्रकरणात अनेक निष्पापांना होत आहे. अरुण पाटील याने आर्थिक व्यवहार करून अर्भकांची विक्री केल्याने या प्रकरणात कायद्यावर बोट ठेवून कारवाई सुरू आहे. एखादी चोरीची वस्तू असल्याप्रमाणे बालके ताब्यात घेण्यात येत आहेत. त्यामुळे कोणताही दोष नसताना या बालकांवर मातृप्रेमाला मुकण्याची वेळ आली आहे.