होमपेज › Kolhapur › इचलकरंजीतील जर्मन गँगला ‘मोका’

इचलकरंजीतील जर्मन गँगला ‘मोका’

Published On: Jan 02 2018 1:32AM | Last Updated: Jan 02 2018 1:27AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

नवीन वर्षाच्या प्रारंभीच कोल्हापूर पोलिसांनी इचलकरंजीतील खून, खुनाच्या प्रयत्नासह खंडणी व अन्य गंभीर गुन्ह्यांच्या रेकॉर्डवरील ‘जर्मन गँग’वर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत कारवाईचा बडगा उगारला. याशिवाय कोल्हापूर व शहापूर येथील आणखी दोन टोळ्या ‘रडार’वर आहेत. टोळ्यांवर लवकरच कारवाईची शक्यता आहे.                                            

म्होरक्या अविनाश शेखर जाधव ऊर्फ जर्मनी, आकाश आण्णाप्पा भिलुगडे, नईम हसन कुकूटनूर, मनोज वामन शिंगारे (सर्व रा. लिगाडे मळा, इचलकरंजी), बजरंग अरुण फातले ऊर्फ बाचके (रा. दत्त मंदिरजवळ), प्रशांत विनायक काजवे (रा. जवाहरनगर) यांचा समावेश आहे. 

जर्मनीच्या अल्पवयीन भावावरही कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध 13 गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले. फरारी अल्पवयीन संशयिताचा शोध घेण्यात येत आहे. म्होरक्यासह सराईतावर शिवाजीनगर, वडगाव, शहापूर (ता.हातकणंगले), कुरूंदवाड  (ता. शिरोळ) पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.

अविनाश जर्मनी व साथीदारांनी इचलकरंजी, कबनूर, शहापूर परिसरात प्रचंड दहशत निर्माण केली आहे. अवैध व्यवसाय, गुन्हेगारीसह औद्योगिक वसाहतीतील कामगारांवर वर्चस्व निर्माण करून आर्थिक गुन्हे करण्यात सराईत सोकावले होते. प्रतिबंधात्मक कारवाई होऊनही टोळीची दहशत वाढतच राहिली. टोळीविरुद्ध ‘मोका’ कायद्यांतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे दाखल करण्यात आला होता. पोलिस महानिरीक्षकांनी त्यास मंजुरी दिल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

दोन टोळ्यांवर लवकरच कारवाई : मोहिते

इचलकरंजीसह कोल्हापूर व शहापूर येथील आणखी दोन टोळ्यांवर ‘मोका’ कारवाईचा प्रस्ताव पोलिस महानिरीक्षकांकडे दाखल करण्यात आला आहे. कारवाईच्या अंतिम टप्प्यातील प्रस्तावावर आठवड्याभरात निर्णय शक्य आहे, असेही मोहिते यांनी सांगितले.