Mon, Jun 17, 2019 00:11होमपेज › Kolhapur › कबनुरात चोरीच्या पैशाच्या वाटणीवरून निर्घृण खून

कबनुरात चोरीच्या पैशाच्या वाटणीवरून निर्घृण खून

Published On: Aug 17 2018 1:44AM | Last Updated: Aug 17 2018 1:44AMइचलकरंजी : वार्ताहर

चोरीच्या रकमेची वाटणी तसेच वर्चस्वाच्या वादातून कृष्णात श्रीपती लोहार (वय 35, रा. वसगडे) या सराईत गुन्हेगाराचा कबनूर येथे सत्तुराने वार करून, निर्घृण खून करण्यात आला. ही घटना 15 ऑगस्ट रोजी पहाटे चारच्या सुमारास घडली. हल्लेखोर पिंटू ऊर्फ रामदास चंद्रकांत बागडी (रा. शिरदवाड, ता. शिरोळ) याने पत्नीसह साथीदाराच्या मदतीने लोहार याचा काटा काढल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी रामदास याच्यासह त्याची पत्नी अश्‍विनी, किरण दत्तात्रय चोपडे या संशयितांना गजाआड केले. 

कबनूर येथील आवळे गल्लीत बुधवारी पहाटे एक युवक रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले. उपचारादरम्यान दुपारी एकच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकाची ओळख पटवण्यात आली.  

कृष्णात हा गेल्या काही दिवसांपासून कबनूर येथे वास्तव्यास होता. रामदास ऊर्फ पिंटू हा त्याचा जवळचा मित्र होता. पोलिसांनी रामदास याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर खुनाची घटना उघडकीस आली. चोरीतील पैसे, सोने वाटणीवरून तसेच टोळीचा म्होरक्या कोण, यातून त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. रामदास हा खंडणीच्या गुन्ह्यात कारागृहात होता. एप्रिल महिन्यात तो जामिनावर सुटला होता. 

मंगळवारी रात्री अश्‍विनी वगळता इतर तिघांनी शिरदवाड येथे मद्यप्राशन केले. तसेच जेवण करून तेथून चौघेही कबनुरात आले. आवळे गल्लीत त्यांच्यात पुन्हा जोरदार वाद झाला. रामदास याने सत्तुराने कृष्णातवर सपासप वार केले. 22 हून अधिक वर्मी घाव बसल्याने कृष्णात जागीच कोसळला. तो मृत झाला असावा, असे समजून त्यांनी पलायन केले. 

घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी पाहणी केली. शिवाजीनगरचे पोलिस निरीक्षक इरगोंडा पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सतीश शिंदे यांच्यासह विविध पथकांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला. अवघ्या काही तासांतच तिघाही हल्लेखारांना शिरदवाड येथेच जेरबंद करण्यात आले. कृष्णात हा अविवाहित होता.

तो सुतारकाम करीत होता, तर हल्लेखोर रामदास याचा शिरदवाड येथे चायनिजचा गाडा आहे. किरण चोपडे हाही त्या ठिकाणीच वास्तव्यास होता. खुनाच्या या घटनेमुळे कबनुरात खळबळ उडाली होती.
दरम्यान, संशयित दाम्पत्याला सात दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तर तिसरा संशयित अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली.