Wed, Jul 17, 2019 00:07होमपेज › Kolhapur › इचलकरंजी उपनगराध्यक्षपदी सरिता आवळे

इचलकरंजी उपनगराध्यक्षपदी सरिता आवळे

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 10 2018 12:26AM

बुकमार्क करा
इचलकरंजी : वार्ताहर

नाट्यमय घडामोडीनंतर इचलकरंजीच्या उपनगराध्यक्षपदी ताराराणी आघाडीच्या  सरिता भाऊसो आवळे यांना संधी मिळाली. त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी केली. निवडीनंतर आवळे यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. प्रकाश मोरबाळे यांनी राजीनामा दिल्यानंतर उपनगराध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे नगराध्यक्षा स्वामी यांनी मंगळवारी नूतन उपनगराध्यक्ष निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन केले होते. उपनगराध्यक्षपद सत्तारूढ ताराराणी आघाडीकडे आहे. त्यामुळे  आघाडीतील इच्छुकांमध्ये पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती.  सोमवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीतही कोणाच्याच नावावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. 

मंगळवारी सकाळी उशिरापर्यंत नावावर चांगलेच वादाचे प्रसंग घडत होते. ताराराणी आघाडीकडून निवडीचे अधिकार दिलेल्या तिघांच्या समितीकडून सरिता आवळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.  दुपारी त्यांचा एकमेव अर्ज अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ.पवन म्हेत्रे यांच्याकडे सादर करण्यात आला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे स्वामी यांनी घोषित केले. उपनगराध्यक्ष पदासाठी गेल्या चार दिवसांपासून ताराराणी आघाडीतील अनेक मातब्बरांनी फिल्डिंग लावली होती. मात्र, अखेर नाट्यमय घडामोडीनंतर आवळे यांना संधी मिळाली.  निवडीनंतर नगराध्यक्षा स्वामी यांच्यासह पदाधिकारी व नगरसेवकांनी आवळे यांचा सत्कार केला. यावेळी अशोक जांभळे, तानाजी पोवार, सागर चाळके, रवींद्र माने, किसन शिंदे, सभापती जुलेखा पटेकरी, श्रीमती शोभा कांबळे, मनोज हिंगमिरे, तानाजी हराळे आदी उपस्थित होते. 

पदाधिकार्‍यांत खडाजंगी  उपनगराध्यक्षपदासाठी ताराराणी आघाडीतील अनेकांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यासाठी जोरदार मोर्चेबांधणीही गेल्या महिन्याभरापासून सुरू होती. मात्र, नावावर एकमत होत नसल्याने नेत्यांचीही डोकेदुखी वाढली होत. नाव निश्‍चितीवरून आघाडीतील काही नगरसेवकांसह पदाधिकार्‍यांमध्ये खडाजंगी झाल्याची चर्चा आहे.